तुळजापूर - शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची शुक्रवारी नित्योपचार पूजा करण्यात आली. आज शुक्रवार असल्यामुळे देवीजींची नित्योपचार झाल्यानंतर विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
        दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.  श्री तुळजाभवानी देवीची विविध अलंकार पूजेस उद्यापासून (दि.17) पासून सुरुवात होणार आहे.  यात, दि.17 रोजी रथ अलंकार महापूजा, दि. 18 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 19 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 20 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 21 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत.तत्पूर्वी, काल (गुरुवारी) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवीने रथातून येऊन भक्तांचे संकट निवारण केले होते, त्यामुळे या रथ अलंकार महापूजेला विशेष महत्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. दुरवरुन येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, तसेच वयोवृद्ध आणि आरोग्याची तक्रार असणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने ओआरएस युक्त पाण्याचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमाबद्दल भाविकांनी खूप समाधानाची भावना व्यक्त केली.
       याशिवाय, दर्शनरांगांच्या ठिकाणी भाविकांच्या विश्रांतीसाठी कक्ष उघडल्यानेही भाविकांनी समाधान व्यक्त केले. दुरवरुन येणारे भाविक यासाठी काही काळ विसावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाविकांना महाद्वाराऐवजी बीडकर तलावाकडील (भवानी तीर्थ) दर्शनरांगेतून भाविकांना दर्शनासाठी जावे लागत आहे. कोणताही गडबड गोंधळ न होता या मार्गाने भाविकांना दर्शन मिळत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. दर्शनरांगेच्या सुरुवातीलाच धर्मदर्शन आणि मुखदर्शन तसेच अभिषेक पूजेची स्वतंत्र रांग असल्याने भाविकांची गर्दी विभागली जाऊन प्रत्येकाला श्री देवीजींचे दर्शन होत आहे. 
श्री तुळजापूर मंदीर संस्थानच्या वतीने भाविक भक्तांची सोय व्हावी, यासाठी दर्शन रांगेत उपस्थित असलेल्या भक्तांना शुध्द पाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदीर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मीक) दिलीप नाईकवाडी, जयसिंग पाटील, श्री.काळे यांच्यासह मंदीर संस्थानचे कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी यांची उपस्थिती होती
 
Top