उस्मानाबाद - अधिकारी , कर्मचारी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होतो. निवृत्ती धारकांना तात्काळ लाभ मिळावेत,यासाठी शासनाने ऑनलाईन पेन्शन प्रणालीद्वारे प्रकरणे सादर करण्यासंदर्भात विविध प्रपत्रामध्ये सुधारणा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. तरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची प्रकरणे ऑनलाईन वेळेत सादर करुन त्यांना सर्व प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोषागार अधिकारी विशाल पवार यांनी केले. 
येथील पोलीस मुख्यालयाच्या अलंकार हॉल मध्ये (दि.30 रोजी) सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी (महसूल) तेजस चव्हाण, अप्पर कोषागार अधिकारी एस.बी. देगांवकर, एस.बी.शिंदे, ए.बी.पवार, प्रशिक्षक एस.बी.घुटे, ए.एस.सिताफुले, श्रीमती एस.जी.घोगरे, एन.बी. बारकुल, एस.आर.ठाकूर,एस.एन.बुंधे यांच्यासह सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 
कोषागार अधिकारी श्री.पवार म्हणाले की, ऑनलाइन पेन्शन केस सहा महिन्यापुर्वी महालेखापाल, नागपूर यांना सादर करणे आवश्यक आहे. कर्मचारी नियमित सेवा करुनही त्यांची प्रकरणे वेळेत सादर न झाल्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेळी व नंतर अडचणी येत असतात. त्यासाठी  ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रकरणे वेळेत सादर करुन त्यांना सर्व प्रकारचे लाभ दिले तरच त्यांना न्याय मिळेल. ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती भरत असतांना अडचणी आल्यास मला व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भेटून शंकेचे निरसन करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
श्री.ए.बी.पवार यांनी सेवा निवृत्तीधारकांनी आर्थीक लाभासाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारु नये, यासाठी वेळीच दक्षता घेऊन ऑनलाईन प्रणालीद्वारे निवृत्ती प्रकरणे सादर करतांना कोणती दक्षता घेऊन प्रकरणे महालेखाकार यांना सादर करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री.घुटे यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यातील प्रपत्रात कशी भरावी व  प्रपत्र अद्यावत करण्याविषयी संगणकाद्वारे माहिती सादर केली. या प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन श्रीमती पूजा दळवे केले तर आभार एस.बी.शिंदे यांनी मानले
 
Top