उस्मानाबाद -: कोजागिरी पोर्णिमा निमित्त सोलापूर जिल्हा व शेजारील राज्यातून  भाविक पायी चालत येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी सेवाभावी संस्थांकडून मोफत अन्नछत्रामार्फत फराळ व अल्पउपहाराची सोय दिली जाते. परंतू  अल्पउपहार झाल्यानंतर भाविकांकडून प्लेट, व इतर साहित्य कचरा कुंडीत टाकले जात नसून ते रस्त्यावर टाकून दिले जाते. त्याचा त्रास  मागून येणा-या भाविकांना होतो. अस्वच्छतेमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी   श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील तामलवाडी येथे स्वच्छचा मोहीम राबविली. 
     स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत अस्वच्छता होणार नाही, तसेच त्याचा त्रास भाविकांना आणि ग्रामस्थांना होणार नाही, यासाठी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. त्याची सुरुवात डॉ. नारनवरे यांनी स्वताच केली. 
अनेक भाविक पायी चालत जाताना अन्नछत्राचा लाभ घेतात मात्र, त्यानंतर कागद अथवा अन्य पदार्थ रस्त्यावरच टाकतानाचे चित्र जागोजागी दिसते. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दि. 25 रोजी रात्री या संपूर्ण मार्गावर पाहणी करुन आढावा घेतला, तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली. यामुळे भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. पायी येणाऱ्या भाविकांनाही आवाहन करुन या मोहिमेत सहभागी होण्याचे तसेच या मार्गावर कचरा न करण्याचे आवाहन करण्यात आले. ठिकठिकाणी दुकानदारांनी तसेच मोफत अन्नछत्र उघडलेल्या स्वयंसेवी संस्थांनी कचरा पेटीची व्यवस्था केली आहे, तेथेच नागरिकांनी कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते. 
याशिवाय, रस्त्याने चालताना काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांबरोबर राहा, आपणास कोणतीही अडचण आल्यास शासकीय यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय, आरोग्याचा त्रास होऊ लागल्यास तात्काळ प्रथमोपचार मिळावे, यासाठी या मार्गावर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या  आहेत तसेच प्रथमोपचार केंद्रेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था केल्याने भाविक समाधान व्यक्त करीत होते. 
 या मोहिमेत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह उप विभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, सहायक गटविकास अधिकारी श्री.शिनगारे, विस्तार अधिकरी श्री. साळुंके, ग्रामसेवक एस.ए.कोठे, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह ग्रामपंचायत  कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. 
अस्वच्छता करणाऱ्या विक्रेत्यांवर व स्वयंसेवी संस्थावर ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विक्रेत्यांने परिसर स्वच्छता राखण्यासाठी कचरा पेटी ठेवण्याचे व भक्तांनी अन्न ग्रहण केल्यास त्यांचे पात्र व अन्य साहित्य कचरा पेटीत टाकून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले. भाविकांनी पदार्थांचा दर्जा, स्वच्छता बघुनच खरेदी करावी, अपायकारक पदार्थ टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
Top