पांगरी (गणेश गोडसे) :-  वाईट हेतूने घरात शिरल्याचा राग मनात धरून एकाचा पिंपरणीच्या लाकडी काठीने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना काल (दि.22) गुरुवारी रात्री 10 वाजता बार्शी-भूम रस्त्यावर काटेगांव-आगळगांव दरम्यान असलेल्या रोडक्या साईड पट्टीलगत असलेल्या मयताच्या शेताजवळ उघडकीस आली.
सुनील अभिमान गाढवे वय 51 रा.काटेगांव ता.बार्शी असे खून झालेल्याचे नांव असून अतुल विजयकुमार गाढवे असे खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव आहे.
  मयताचा मुलगा सचिन सुनील गाढवे (रा.काटेगांव वय 23) याने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,काल दि.22 गुरुवारी दुपारी दोन वाजता त्यांचे वडील मयत सुनील अभिमान गाढवे हे त्यांच्याच भावकीतील आरोपी अतुल गाढवे याच्या घरात फक्त अंतवस्‍त्रावरच उघडे होऊन जेवण मागण्याच्या निमित्ताने वाईट हेतूने शिरल्याचा संशय आल्याने त्याचा राग मनात धरून मयतावर पाळत ठेऊन ते शेतातील गोठ्याकडे जाताना गाठून पिंपरणीच्या लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण करून जीवे ठार मारले आहे असे म्हटले आहे.
स.पो.नि.सोमनाथ वाघ,श्री.केकान,गृहरक्षक दलाचे समीर शेख,श्री.गरड हे पांगरी पोलिसांची गाडी रात्र गस्तीसाठी हद्दीतील आगळगांव,काटेगांव भागात घेऊन गेल्यानंतर त्यांना ही खुनाची घटना निदर्शनास आली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपीस ताब्यात घेतले.
  बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.शितल भोपलकर यांनी शवविछेदन केले.डोके,मेंदू व शरीरातील इतर अवयांवर बेदम मारहाण झाल्यामुळे मृतू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.सचिन गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल गाढवे याच्यावर जिवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.घटनास्थळास उपविभागीय अधिकारी प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पाहणी केली असून अधिक तपास पांगरीचे स.पो.नि.सोमनाथ वाघ करत आहेत.

 
Top