मुबई - गेले वर्षभर सुरु असलेले “स्वच्छ भारत अभियान” लोकप्रियतेची नवीन शिखरे सर करत असताना, स्वच्छतेबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकतादेखील वेगाने पसरते आहे. अभियान केवळ कागदपत्रांमध्ये अडकून राहणार नाही. हे अनेक यशोगाथा आणि स्वच्छतेबाबत वाढती वचनबध्दता यावरुन सिध्द होते
केवळ अधिकरीच नाही तर सहभागी झालेल्या अनेक सामाजिक संस्था तसेच अन्य विभाग अभियानाचे स्वरुप आणि त्याच्या यशाची आकडेवारी सादर करत आहेत. आता, बहुतांश लोक आणि सरकारी तसेच बिगर सरकारी संस्था स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात गुंतले आहेत. शहर विकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या मते, स्वच्छ भारत अभियान सरकारच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे, अन्य उपक्रम मागणीद्वारे प्रेरित आहेत. तर हया अभियानाचा उद्देश स्वच्छता सेवा आणि पायाभूत सुविधांसाठी मागणी निर्माण करणे हा आहे. यामध्ये लोकांना प्रेरित करणे आणि योग्य सवय लावून घेण्यासाठी त्यांना सजग करणे समाविष्ट आहे.
आपल्या अनोख्या स्वरुपामुळे, स्वच्छ भारत अभियान ही केंद्र सरकारकडून चालवण्यात आलेल्या सर्व नवीन अभियानांची जननी आहे, असे नायडू म्हणतात. जग देखील याकडे मोठया उत्सुकतेने पाहत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांनी अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर देशभरात विविध वयोगटातील लोक प्रेरित झाले आणि हेच या अभियानाचे सर्वात मोठे यश असल्याचे नायडू यांनी सांगितले.
व्यवहारात्मक परिवर्तन अधिक सुदृढ आणि संघटित करण्यासाठी गेल्या महिन्यात एक ठोस अभियान सुरु करण्यात आले. लोकांना स्वच्छतेप्रती प्रेरित करण्यासाठी हे अभियान पुढल्यावर्षी मार्चपर्यंत 11 विशिष्ट क्षेत्रांमध्ये राबवण्यात येणार आहे. यात कृषी आणि धान्य बाजार, धार्मिक आणि पर्यटन स्थळे, शिक्षण संस्था, भुयारी मार्ग, उड्डाण पूल, छावणी परिसर, जलाशय, करमणुकीची ठिकाणे, रुग्णालये, जुनी शहरे आणि सरकारी कार्यालये यांचा समावेश आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त स्वच्छ भारत परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांनी घरांमध्ये शौचालये बांधण्याच्या कामात चांगली प्रगती केली आहे. मार्च 2016 पर्यंत, शहरी भागात, 25 लाख घरांमध्ये शौचालये बांधण्याचे जे उद्दिष्ट आहे, त्यापैकी 16 लाख 45 हजार शौचालयांचे बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू यांसारख्या प्रमुख राज्यांनी याकामी अद्याप गती पकडलेली नाही. केरळ, दिल्ली, अंदमान-निकोबार द्विपसमूह, चंडिगढ, दमण, दीव, दादरा नगर हवेली, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा या राज्यांमध्ये शौचालयांचे बांधकाम अद्याप सुरुही झालेले नाही.
याकामात अनेक राज्यांनी दाखवलेल्या उत्साहाबाबत नायडू म्हणाले की, शहरी भागात प्रत्येक शौचालयाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या 4 हजार रुपये अर्थसहाय्या व्यतिरिक्त 13 राज्ये 4 हजार ते 13 हजार रुपये अतिरिक्त अर्थसहाय्य देत आहेत.
घनकचरा व्यवस्थापनामध्ये चंडिगढ अव्वल
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा सामना करण्यासाठी स्वच्छता अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्थानिक रहिवासी संघटना स्वच्छता अभियान राबवले आणि स्वत: निधी गोळा करुन धूर फवारणीची यंत्रे खरेदी केली. पंतप्रधानांनी 69 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात अभिमानाने स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाल्याचे जाहीर केले. समाजातील सर्व वर्गातील लोक यामध्ये सहभागी झाल्याचे ते म्हणाले. या अभियानाला सर्वात जास्त पाठिंबा 10 ते 15 वर्षे वयोगटातील कोटयावधी मुलांकडून मिळाला आणि ते या अभियानाचे सर्वात मोठे दूत बनले.
आता कुठे हे अभियान सुरु झाले आहे, ते पुढे न्यायचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. शाळांमध्ये सव्वा चार लाख शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले आहे असे ते म्हणाले. गेल्या वर्षभरात अनेक राज्यांनी तसेच केंद्रीय मंत्रालयानी या दिशेने अनेक योजना सुरु केल्या.