
भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे-घाटे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रियंका भगत-नारनवरे, मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सुजित नरहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 18 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 19 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 20 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 21 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (शुक्रवारी) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
या देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नवीन केलेल्या बदलास भाविकांकडून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून एक ते दोन तासात गोंधळ न होता दर्शन होत असल्यामुळे भाविकांमधून उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय, दर्शनरांगांच्या ठिकाणी भाविकांच्या विश्रांतीसाठी कक्ष उघडल्यानेही भाविक या विश्राती कक्षात विश्रांती घेत आहेत.दर्शनरांगेच्या सुरुवातीलाच धर्मदर्शन आणि मुखदर्शन तसेच अभिषेक पूजेची स्वतंत्र रांग असल्याने भाविकांची गर्दी विभागली जाऊन प्रत्येकाला श्री देवीजींचे दर्शन होत आहे.