पांगरी ( गणेश गोडसे ) होशियार..खबरदार..जागते रहो..,ग्रांमपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून एका रात्रीवर मतदानाची प्रक्रिया येऊन ठेपली आहे.जात,धर्म,पंथ,नाती,गोती,गोत्र आदींचा आधार घेऊन मताचा जोगवा मागितला गेला आहे.
         वेगवेगळी आमिषे,आश्वासणे,थापा,गप्पा मारून व जेवणावळी घालून मतदारांना आपलेस करण्यात नेत्यांना यशही आले आहे.स्थानिक उमेदवार नेत्याचे भवितव्य मतपेटीत बंद करण्यासाठी काळ,वेळ हळूहळू पुढे पुढे सरकत चालला आहे.कधी मतदान होईल आणि आम्ही यातून निवांत होतोय अशीच काहीशी अवस्था नेतेमंडळीची झालेली आहे.मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा,तयार ठेवण्यात आली असून यावेळेस पोलिस बंदोबस्तही खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे.पंधरा दिवसांच्या सरावाची मुदत संपत चालली असून नेत्यांच्या रंगीत तालमीही पूर्ण झाल्या आहेत.प्रयोग सादर करण्यासाठी सगळे तयार आहेत.
शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार फेर्‍या,वैयक्तिक गाठी भेटी,यामुळे गावो गावी निवडणूकमय वातावरण निर्माण झाले होते.होणारी निवडणूक अटी तटीची होत असल्यामुळे वाहनांचा निवडणुकीसाठी प्रथमच वापर करण्यात आला.
   रात्र वैर्‍याची आहे: प्रत्येक निवडणुकीच्या अंतिम चरणात मतदान प्रक्रियेच्या अगोदरच्या शेवटच्या रात्रीला खूपच महत्व असते.कारण निकाल बदलण्याची ताकत या एका रात्रीत दडलेली असते असे नेतेमंडळी ठासून सागत असतात.उमेदवार व नेत्यांचे हितचिंतक गावात येणार्‍या रस्त्यावर,चौकाचौकात,रात्रभर थांबून विरोधक काही काळेबेरे करतात का याच्यावर नजर ठेऊन असतात.पूर्वीच्या काळात गावावर सांगून दरोडे टाकण्यात येत असायचे तेव्हा संपूर्ण ग्रामस्थ एकवटून गावाच्या मुख्य वेशीवर गावाच्या सुरक्षेसाठी रात्री जागून काढून जनतेचे रक्षण करायचे.मात्र काळ बदलला.दरोडेखोरांचे राहणीमान,निवास,यात आमुलाग्र बदल घडून जंगलातील दरोडेखोर पांढपेशे बनून शहरातच स्थिर-स्थावर झाले.आजही त्यांचे हस्तक येतात जनतेला ओरबाडून घेऊन जातात,बदल फक्त थोडा झालाय.
   निवडणुका अटीतटीच्या होत असल्यामुळे नेत्यांनी गाफिल न राहाता जागता पहारा देण्याचे आदेश दिले आहेत.आरोप प्रत्यारोपाच्या मालिका संपल्या असून आता नेतेच आपण कधी,कोठे,काय काय आरोप केले त्याचा काय परिणाम होतोय याची चाचपणी करत आहेत.कधी कधी सत्य मान्य करत जनता सुज्ञ झाली असून योग्य निर्णय घेऊन आपल्या मनाची समजूत घालून जनतेचेही कौतुक केले जात आहे.उमेदवार आपण केलेली कामे घसा कोरडा पडस्तोर जनतेपुढे मांडून निवडून देण्याचे आवाहन करू लागले आहेत.
 निवडणूकींवर सट्टा;  कोणता निवडणूक पूर्व अंदाज खरा ठरणार,कोणाचा अंदाज फोल ठरणार यावर सध्या जास्त चर्चा होताना दिसत आहे.आपल्या बाजूने अंदाज वर्तवण्यासाठी कोणी किती पैसे मोजले,कोणाला किती पार्ट्या दिल्या,कोणी किती घेतले,कोणी गोप्यस्फोट दाबले यावर सगळीकडेच चविणे चर्चा सुरू आहे.यावरून मतदारांनी काय बोध घ्यायचा.निवडणूक पूर्व अंदाज आपल्या बाजूने करून घेऊन आपल्यासाठी वातावरण चांगले असल्याचा भास निर्माण करून घेऊन वाहवा मिळवण्यात सगळेच धन्यता मानत आहेत॰पक्ष,पदाधिकारी,नेते,व त्यांना साथ देणारे कार्यकर्ते यांनी पातळी सोडून निवडून येण्यासाठी झटत आहेत.

 
Top