उस्मानाबाद -: बालवयात होणा-या संभाव्य घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, हिब आणि हेपिटायटिस बी अशा प्राणघातक रोगांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी राज्या शासनामार्फत सुरु केलेल्या पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी येथील जिल्हा रुग्णालयत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी केला.
यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. कुलदिप(धिरज) पाटील, माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, आरोग्य संचालक डॉ.सतिष पवार, अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील, सहायक संचालक डॉ.साधना तायडे, उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ.व्ही.एम.कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.ई.रायते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले, सहायक संचालक आरोग्य सेवा डॉ.बोरसे,डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी व आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्यने उपस्थिती होती.
डॉ.सावंत म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा माता आणि बालसंगोपनात राज्यात प्रथम आला आहे. लहान बालकांना बालपणात होणाऱ्या रोगांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी या पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा फार मोठा फायदा होणार असून ही पंचसूत्री राज्यात राबविण्यासाठी यांचा शुभारंभ करण्याचा मानही उस्मानाबाद जिल्ह्याला मिळाला आहे. अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे कार्य जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात येणार आहे. या लसी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून ही लस सर्व बालकांना राज्य शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे,याचा लाभ घ्यावा. यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असून हा जिल्हा एक आदर्श जिल्हा म्हणून कार्यरत राहील, असेही गौरवोदगार डॉ.सावंत यांनी यावेळी काढले.
यावेळी डॉ.सावंत यांनी प्राथनिधिक स्वरुपात काही बालकांना लसीकरण करण्यात आले.