पंढरपूर : आध्यत्माची दक्षिण काशी असणा-या पंढरीनगरीनगरीत रविवारी कार्तिकीवारीचा भक्तीमय सोहळा रंगणार आहे. कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक आज पंढरीत दाखल झाले आहेत.
पंढरीत दाखल झालेल्या भाविकाला पांडुरंगाच्या दर्शनाची मोठी उत्सुकता असली तरी तो सर्वप्रथम चंद्रभागेत आपले स्नान उरकून नंतर विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतो. त्यामुळे या कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरीत दाखल झालेले भाविक चंद्रभागेतील उपलब्ध पाण्यात आपले पवित्र स्नान उरकत आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची चांगलीच गर्दी झाली आहे. चंद्रभागा नदीचे वाळवंटही या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी फुलून गेल्याचा प्रत्यय येत आहे. पंढरीतील टाळ, मृदंग, बुक्का, गोपीचंदन, तुळशी माळ अशा विविध प्रासादिक वस्तूंना आध्यात्मामध्ये मोठे महत्त्व आहे. 
पांडुरंगाचा प्रसाद हा भाविकांना मिळावा या हेतूने मंदिर समितीच्या वतीने बुंदीचे लाडू बनविण्यात आले असून समितीतर्फे भाविकांसाठी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेड, दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे, तर अनेक भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन तेथूनच पांडुरंगाचेही दर्शन घेत आहेत. 
 
Top