नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या श्री खंडोबाची यात्रा पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी आहे.त्यानंतर श्री खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल.
श्री खंडोबाचा अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूरमध्ये पावणे दोन महिने मुक्काम असतो. अणदूर ते मैलारपूर हे अंतर साधारण ४ किलोमीटर आहे.दोन्ही ठिकाणी स्वतंत्र मंदिरे आहेत.मंदिरे दोन असली तरी देव मात्र एकच असतो.देवाची एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रतिष्ठापणा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे.ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.अणदूरहून मैलारपूरला देवाच्या मुत्र्या पालखीत घालून वाजत गाजत नेण्यात येतात,आणताना तिच प्रथा असते.अणदूरची यात्रा दरवर्षी देवदीपावली रोजी तर मैलारपूरची यात्रा पौष पोर्णिमा रोजी असते.
श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह नळदुर्गच्या भुईकोट किल्लात झाला होता.नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीसाठी श्री खंडोबा येथे प्रकट झाले ही आख्यायिका आहे.श्री खंडोबाची दगडी मुर्ती स्वयंभू असून ती जागृत आहे.नवसाला पावणारा हा देव असल्याने अणदूर आणि मैलारपूरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी असते.जेव्हा मैलारपूरमध्ये श्री खडोबाचा मुक्काम असतो,तेव्हा दर रविवारी मोठी यात्रा भरते.
अणदूरच्या श्री खंडोबा यात्रेच्या पाश्र्वभूमीवर मदिराच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे.अगोदर शिखर,सभामंडप आणि प्रवेशव्दार असे रंगकाम करण्यात येत आहे.नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मालाकोली येथील रंगकाम करणा-या कलाकारांना त्याचे काम देण्यात आले आहे.येथील कलाकारांनी महाराष्ट्रातील अनेक मंदिराचे रंगकाम केलेले आहे.भाविकांच्या देणगीतून हे काम सुरू आहे.
त्याचबरोबर यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.यात्रेच्या दरम्यान मंदिरासह प्रवेशव्दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून,दर्शनासाठी दर्शन बारी तयार करण्यात येणार आहे.त्याचबरोबर अन्य सोयीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.श्री खंडोबा यात्रा कमिटी आणि श्री खंडोबा देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य अणदूरची १२ डिसेंबर रोजीची यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.