मुंबई :- भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि कन्फ्रेड्रेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीज तसेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 74 व्या आंतरराष्ट्रीय कपास सल्लागार समितीची बैठक दिनांक 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान मुंबई येथे आयोजित केली असल्याची माहिती भारत सरकारच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत मुंबई येथे दिली.
       जवळपास 11 वर्षांनंतर ही आंतरराष्ट्रीय परिषद भारतात मुंबई येथे होत असून 1939 रोजी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय कपास सल्लागार समितीचे भारतासह ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, सुदान आणि अमेरिका हे सहा संस्थापक देश आहेत. तर 35 सदस्य संस्थापक आहेत. या परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय राज्य वस्त्रोद्योग मंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते दि. 7 डिसेंबर 2015 रोजी करण्यात येणार आहे. यावेळी जवळपास जागतिक स्तरावरील 50 देशांचे 500 प्रतिनिधी या पाच दिवसांच्या परिषदेत उपस्थित राहतील.
       ‘फ्राम फार्म टू फॅब्रीक: द मेनी फेसेस ऑफ कॉटन’ ही या परिषदेची संकल्पना असून याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर कपास उत्पादनांमध्ये झालेले तंत्रज्ञानात्मक बदल, कपास सांख्यिकीमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, कपास उपयोगितेमध्ये महिलांना प्रोत्साहन तसेच सेंद्रिय कपास, पायाभूत गुंतवणूक, नैसर्गिक रंगीत कपास अशा विविध विषयांवर विविध सत्रांचे आयोजन या परिषदेदरम्यान करण्यात आले आहे.
         भारतातील वस्त्रोद्योगातर्फे जवळपास 4.5 कोटी लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला असून या उद्योगाचा जीडीपीमधील वाटा 4 टक्के आहे तर औद्योगिक उत्पादन 12 टक्के आहे.  या क्षेत्राचा विदेशी विनिमयामध्ये मोठा सहभाग असून या क्षेत्राद्वारे जवळपास 38 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी निर्यात 2014-15 मध्ये झाली असल्याची माहिती गुप्ता यांनी यावेळी दिली.
          डॉ. कविता गुप्ता पुढे म्हणाल्या की, 60 टक्के एकूण फायबरचा उपयोग भारतातद्वारे केला जातो त्यामुळे कपास अर्थव्यवस्था ही भारताच्या वस्त्रोद्योगाचे इंजिन आहे.  तसेच भारताला जागतिक कपास अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान असून केवळ मोठा कपास निर्माता म्हणून नाही तर मोठा निर्यातक आणि मोठा कपास ग्राहक म्हणूनही भारताला मान्यता मिळाली आहे.  
      या परिषदेदरम्यान व्यापार प्रोत्साहन, उद्योग आणि संस्कृती, उत्पादन निर्यात या विषयांवर आंतरराष्ट्रीय चर्चा होणार असून कपास निर्माते, विक्रेते आणि कपास व्यापारी देश यांच्यात आंतरराष्ट्रीय व्यापार संधी यावर चर्चा करण्यात येईल.

 
Top