उस्मानाबाद :- देशाची सेवा करतांना आपल्या जीवाची पर्वा न करता शुरवीर सैनिक संरक्षण करतात. देशात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात धावून जातात. वेळप्रसंगी देशासाठी प्राणार्पण करतात. त्यांचे कार्य हे अभिमानास्पद आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पाल्य व कुटुंबासाठी शासन कल्याणकारी योजना राबवित असते. सैनिकांची कामगिरी लक्षात घेवून सैनिकाचे ऋण फेडण्यासाठी ध्वजादिनाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यासाठी ध्वजदिनी संकलन करावे, जेणे करुन माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबाना नवीन रोजगारांची संधी निर्माण करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
    येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे सशस्त्रसेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करताना डॉ.नारनवरे यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, न.प.मुख्याधिकारी राजेश जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि)सुभाष सासणे, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी  सैनिक, विधवा, पाल्य आदि उपस्थित होते.
       डॉ.नारनवरे म्हणाले की, आपण आपल्या कुटूंबियासह सुखाचे व सुरक्षेतेचे जीवन व्यतीत करीत असतो, त्याचे सर्व श्रेय देशाची सेवा करणाऱ्या जवानांना जाते. देशाचे संरक्षणासाठी सैनिक शहीद होतात तर कांही सैनिक कायमचे अपंग होतात. कांही दुर्धर आजाराने त्रस्त असतात. त्यांच्या पश्चात जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील दैनंदिन अडचणी दूर व्हावे व  त्यांचे जीवन सुसह्य  व्हावे व युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनासाठी  ध्वजनिधीत जमा झालेला निधी हा जवान/शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी मदत करत असल्याचे त्यांनी सांगीतले.
डॉ.घाडगे म्हणाल्या की,  सैनिकांच्या प्रती  जबाबदारी व उत्तरदायीत्व ओळखून सढळ हाताने ध्वजदिन  निधीस मदत करावी. त्या सैनिकांनी देश सुरक्षित रहावे, यासाठी वीरमरण पत्करले आहे. समाजाचे नागरिक म्हणून ही जबाबदारी सर्वांनी निधी संकलनाच्यामाध्यमातून पार पाडावयाची आहे, असे त्या म्हणाल्या.
     यावेळी श्री.रायते म्हणाले की, देशसेवेसाठी कार्य केलेल्या सैनिकांना अडचणी सोडविण्यासाठी व माजी सैनिकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न केले जातील. सैनिकांच्या पाल्य व कुटूंबियांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी  ध्वजदिन निधीस हातभार लावावा,असे आवाहन त्यांनी केले.
     यावेऴी  वीरमाता/ वीरपत्नी/ युध्द विधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विशेष परिश्रम घेऊन ध्वज दिनी गोळा केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तर ध्वजदिन निधी संकलन कार्यालयात योगदान देणारे शासकीय अधिकाऱ्यांचा भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी युध्दात शहीद  झालेल्या सैनिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी/विरमाता यांचा सन्मान प्रमुख पाहूण्यांचे हस्ते करण्यात आला.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर(नि)सासणे यांनी करुन आयोजनामागील पार्श्वभूमी विशद केली. सूत्रसंचालन एस.सी.पाटील यांनी केले तर आभार श्री.बी.एम.शेंडगे यांनी मानले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आर.व्ही. गलांडे,प्रकाश इंदूरकर, तोत्रे विलास, श्री.बचूरे, मनोज खोपे, सुरेश बरडे,अशोक भोसले, श्री.सुतार आणि श्री. सुरवसे याचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.   
 
Top