उस्मानाबाद :- राज्यभरात १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रव्यापी विचार यात्रेचे उस्मानाबादमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांसह इतर लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उस्मानाबादकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर महाराष्ट्रव्यापी विचार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील टप्पा पूर्ण केल्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, बीड जिल्ह्यातून ही विचार यात्रा गुरूवारी सकाळी उस्मानाबाद शहरात दाखल झाली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ विचार यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे आणि ऍड. भारती ठवळे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या विचार यात्रेअंतर्गत कॉम्रेड गोविंद पानसरेंसह पुरोगामी चळवळीतील अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचाही या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आला होता. या पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ऍड. देवीदास वडगावकर, जिजाऊ जन्मोत्सव समितीचे रोहीत बागल, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष रवि निंबाळकर, राज ढवळे, सरस भारत अकादमीचे ऍड. राज कुलकर्णी, माधव इंगळे, रविंद्र केसकर, सुनिल बडूरकर, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सचिव राकेश वाघमारे, राहुल साळवे, संविधान फाउंडेशनचे हुंकार बनसोडे, सुदेश माळाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुदेश माळाळे तर आभार ऍड. राज कुलकर्णी यांनी मानले. 
 
Top