कळंब : दहिफळ (ता. कळंब) येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाविकांनी यळकोट यळकोट घे च्या जयघोषात भंडा-याची मुक्‍त उधळण केली. 
कळंब तालुक्‍यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा चंपाष्टमी या दिवशी भरते. वर्षातुन होणारी ही यात्रा पंचक्रोशीत सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. घटस्थापना झाल्यापासून यात्रेस सुरूवात होते. नागदिव्याच्या दिवशी भरीत वडगा, नागदिवे देवाला नैवेद्य म्हणून दाखविला जातो. रात्री परंपरेनुसार भव्य असा छबिना काढण्यात आला. यावेळी नृत्यांगणामध्ये तिन ग्रुप होते. यात्रा कमिटीतर्फे, गावातील तरूण युवक मंडळींनी जामखेड येथील नृतिका आणल्या होत्या. लेझीम पथक, बँड, वारूवालेसह शेवटचा छबिना संपन्न झाला. छबिना संपताच गावातील भाविकांनी देवाला ओल्या अंगाने दंडवत घातला. सकाळी १० वा. पहिला मानाचा नैवेद्य पाटलांचा दाखविण्यात आला. तर दुसरा मान वाजत गाजत दु. १ वा. सुतार समाजाचा दाखविण्यात आला. नैवेद्य दाखविल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिर परिसर हजारो भाविकांनी फुलून गेला होता. छावणीचा लंगर तोडण्याचा मान श्रीकांत धोंगडे, सज्जन कोठावळे यांचा होता. लंगर तुटल्यानंतर देवाचा रथ मिरविण्यात आला. या गाडा बगाद्याचे घंटीचे मानकरी गणेश मते, गजेंद्र मते, राजकुमार जोगदंड, संभाजी मते, कृष्णा लोहार, तर बैलाचे मानकरी भागवत कदम, देविदास भूसारी, तुकाराम भातलवंडे, भाऊसाहेब घेवारे होते. 
 
Top