उस्मानाबाद -: शासनाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नळदुर्ग नगरपालिकेस विविध योजनेंतर्गत कोटयावधी रुपयेचा निधी देवून अनेक महिने उलटून गेले. तरी अदयाप अनेक कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. न.प. खात्यावर हा निधी पडून असून विकास कामे करण्यासाठी न.प. प्रशासन उदासिन तर न.प. सदस्य निष्क्रीय असल्याची संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी खास बाब म्हणून नगरविकास मंत्रालयाने लक्ष घालून प्रशासनातील मुजोर अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गेल्या पाच वर्षापूर्वी नागरी दलितवस्ती योजनेंतर्गत बुध्दविहार कुंपनभिंत बांधकाम करणे, डॉ. आंबेडकर सभागृह भाग एक व दोन, पिठाच्या गिरणी पाठीमागे भिमनगर ते बौध्दनगर रस्ता भाग, बौध्दनगर येथे अक्कलकोट ते विकास कांबळे यांच्या घरापर्यंत गटार बांधणे, इंदिरानगर येथे प्रशासकीय मान्यता मिळालेल्या पाईपलाईनची काम, असे अपूरे कामे पुर्ण करण्याबाबत तत्कालीन नगरसेविका व विदयमान उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई खारवे यानी दि. 5 ऑगस्ट 2013 रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिका-यास लेखी दिले होते. मात्र या वरील कामापैकी मोजकेच कामे करण्यात आली. तर अनेक वर्षापासून अनेक कामे अपूर्ण असल्याने शहराच्या विकासाचे तीन तेरा वाजल्याची चर्चा नागरिकांत रंगत आहे.
      नळदुर्ग नगरपालिकेस शासनाने न.प. फंड, रस्ता निधी, दलित वस्ती सुधार योजना, दलित वस्ती पाणी पुरवठा योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार, वैशिष्टयपूर्ण योजना, स्थानिक विकास कार्यक्रम, यूडी 6, एकात्मिक विकास कार्यक्रम, अल्पसंख्यांक योजना, आयएचएसडीपी योजना, अग्निश्मन, तेरावा वित्त आयोग, नगरोत्थान, नागरी दलीत्तेतर योजना, रमाई आवास योजना, बारावा वित्त आयोग घनकचरा, बारावा वित्त आयोग इतर, दहावा वित्त आयोग, अकरावा वित्त आयोग, राजीव गांधी घरकुल योजना, राज्य नागरी उपजीविका अभियान, तेरावा वित्त आयोग, आयएचएसडीपी योजना, महाराष्ट्र मिशन, चौदा वित्त आयोग आदींसह इतर योजनेतून कोटयावधी रुपयेचा निधी वेळोवेळी शहराच्या विकासासाठी दिल्याचे उघडकीस आले आहे. मात्र बहुतांश योजनेतून अदयापपर्यंत कामे झाले नसल्याचे दिसून येते. तर अनेक कामे ते आजही अधर्वट असल्याचे दिसून येते.
नगरपालिकेत गैरकारभाराने उच्चांक गाठला असून पालिकेच्या कारभारात सुधारणा व्हावी म्हणून  अनेकांनी यापूर्वी वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे धाव घेवून तक्रार केली. याची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यमान नगरसेवकासह अनेकांनी नगरपालिका कार्यालयासमोर उपोषणही केले. मात्र त्यावर काय कारवाई झाली हे आजतागायत गुलदस्त्यात आहे. इंदिरानगर येथे दोन ते अडीच वर्षापूर्वी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत अंदाजे दहा लाख रुपये खर्चून जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र अदयाप या जलवाहिनीवरुन पाणी उडवून त्याची टेस्टींग झाली नाही व एकाही नागरिकाला अदयाप या जलवाहिनीवरुन एकही नळ कनेक्शन देण्यात आले नाही. कारण या कामात भ्रष्टाचार झाला असून सदरील कामात अर्धवट जलवाहिनी टाकण्याचे काम करुन ठेकेदाराने अधिका-यांना हाताशी धरुन या कामाचे पुर्ण बील उचलले आहे. शहराध्यमध्ये पाचपीर येथील गंजेशाही कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधण्याचे काम ठेकेदारास दिले. मात्र संबंधित ठेकेदाराने सदरील कामाची सुरुवात केलेली नसतानाही न.प. ने या ठेकेदारास दोन वर्षापर्वूी 5 लाख रुपये अग्रीम म्हणून दिले. आजही हे काम सुरु झाले नाही. किंवा न.प. ने गुत्तेदाराकडून पैसे वसुल करुन घेतले नाही. या व इतर प्रकरणी नियमबाहय चौकशी करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडे नोव्हेंबर 2015 मध्ये लेखी मागणी करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी काय कारवाई झाली हे अद्याप समजू शकले नाही.

     नळदुर्ग येथील दलित वस्तीच्या कामासाठी करोडो रुपये पडून असताना देखील याकडे प्रशासनाला  लक्ष दयायला वेळ नाही की, जाणीव पुर्वक दुर्लक्ष करित आहेत. असा आरोप मागासवर्गीय नागरिकांतून केला जात आहे.  रमाई आवास योजनेसाठी दीड कोटीपेक्षा अधिक निधी पडून असताना न.प ने सर्व्हे नं. 29 मध्ये मागासवर्गीय नागरिकांच्या नोंदी घेवून तेथे रमाई आवास योजना राबविण्याचा ठराव घेतला असताना या कामाबाबत न.प. प्रशासन उदासिनपणा दाखवत असल्याची संतप्त भावना दलित नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. याउलट न.प. ने आलेल्या निधीचे व्याज वर्ग करुन इतरत्र वळवा -  वळवी करण्यात मग्न असल्याचे उघडकीस आले असून न.प च्या गलथान कारभाराचा रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ तालुकाध्यक्ष एस.के गायकवाड, शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे  यांनी नळदुर्ग येथे गेल्या  महिन्यात झलेल्या न.प वरील मोर्चा प्रसंगी निषेध करून संताप व्यक्त केल्याचे सर्वश्रुत आहे.   
 
Top