नळदुर्ग शहरातील
शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, वितरण कंपनी, खासगी संस्थेचे शाळा आदी कार्यालयाकडे
नगरपालिकेची अनेक वर्षापासूनची घरपटटी, नळपटटी थकबाकी बिलापोटीची रक्कम तब्बल 46 लाख
रुपये थकले आहे. सध्या सर्वत्र मार्च एण्ड निमित्त विविध कार्यालयात वसूली मोहिम सुरु
असताना मुख्याधिकारी गेल्या महिन्याभरापासून दिर्घ रजेवर असल्याने नागरिकांची अनेक
कामे खोळंबली आहेत. कामचुकार करणा-या मुख्याधिका-यांविरुध्द जिल्हाधिका-यांनी कारवाई
करावी, न.प. ची थकबाकी भरण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करणा-या संबंधितांची मालमत्ता जप्त
करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
शहरातील
नगरपालिका हदृीतील शासकीय, निमशासकीय कार्यालयाकडे अनेक वर्षापासूनची थकबाकीपोटी रक्कम
मोठयाप्रमाणावर थकलेली आहे. रहिवाशी प्रमाणपत्र, आठ अ नक्कलसह इतर आवश्यक प्रमाणपत्र
नागरिकांनी न.प. कडे मागणी केल्यास प्रथम घरपटटी व नळपटटी भरल्यानंतरच प्रमाणपत्र दिले
जाते. मात्र विविध कार्यालयाकडे लक्षावधी रुपये थकबाकी असल्याने न.प. अधिकारी वसूल
करण्याऐवजी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप शहरवासियांतून होत आहे. तर नगरपालिका
वसूलीच्या नावाखाली कागदी घोडे नाचवून कर्तव्य पार पाडत असल्याचे नेहमीप्रमाणे यावेळीही
दिसत आहे. राजकीय वरदहस्तामुळे थकबाकी वसुली करण्यास कर्मचारी दिरंगाई करीत असल्याचे
बोलले जात असून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालण्याची
मागणी होत आहे.
पोलीस
ठाण्याकडे घरपटटी व पाणीपटटी मिळून चालू व थकित असे एकूण 21 हजार 347 रुपये न.प. ची
थकबाकी आहे. पाटबंधारे कार्यालयाकडे घर व नळपटटी
असे मिळून 38 हजार 355 रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 22 हजार 181 रुपये, शासकीय धान्य गोडावून कडे 19 हजार 36 रुपये, शासकीय
विश्रामगृह 19 हजार 267 रुपये, दुरसंचार केंद्राच्या बीएसएनएल कार्यालयाकडे 2 लाख
78 हजार 510 रुपये, पोस्ट ऑफीस 30 हजार 910 रुपये एवढी थकबाकी आहे.
जिल्हा
परिषद शाळा
जि.प. प्राथमिक शाळा वसंतनगर 11 हजार 739 रुपये,
जि.प. प्रशाला इंदिरानगर 26 हजार 415 रुपये, जि.प. केंद्रिय प्राथमिक शाळा माऊली नगर
19 हजार 924 रुपये, जि.प. प्रशाला (मुलांची) 29 हजार 810, जि.प. प्राथमिक शाळा किल्लागेट
44 हजार 447 रुपये, जि.प. माध्यमिक शाळा शनिवारवाडा 17 हजार 562 रुपये, केंद्रीय प्राथमिक
शाळा भिमनगर 19 हजार 260 रुपये, जि.प कन्या प्रशाला 39 हजार 508, जि.प. प्रशाला मुलींची
बौध्दनगर 26 हजार 385 रुपये एवढी थकबाकी आहे.
संस्थेच्या
खासगी शाळा
अंजनी
प्रशाला 14 लाख 3 हजार 370 रुपये, नॅशनल शाळा 16 हजार 748 रुपये, अध्यापक विदयालय 5
हजार 68 रुपये, बालाघाट कॉलेज 7 लाख 82 हजार 16 रुपये थकबाकी आहे.
महावितरणचे 132/के.व्ही. कार्यालयाकडे 1999 पासून
ते आजतागायत तब्बल 14 लाख 16 हजार 814 रुपयाची थकबाकी आहे. तसेच पोष्ट बेसिक आश्रम
शाळा वसंतनगर 1 लाख 57 हजार 897 रुपये, सार्वजनिक बांधकाम विभाग डाक बंगला शनिवारवाडा
19 हजार 692 रुपये, जि.प. क्वार्टर जि.प. बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता श्रेणी-1
नळदुर्ग 8 हजार 697 रुपये, पशुवैदयकीय दवाखाना 5 हजार 547 रुपये असे मिळून विविध कार्यालयाकडे
सुमार 46 लाख 38 हजार 766 रुपये थकबाकी असल्याचे नगरपालिका सांगत आहे. त्यामध्ये अंजनी
प्रशालेकडे गेल्या अनेक वर्षापासूनची थकलेली थकबाकी 14 लाख 3 हजार 370 रुपये आहे. त्यामध्ये
12 हजार 930 रुपये चालू येणे रक्कम आहे.