नळदुर्ग :- येथील अक्कलकोट रोडलगत असलेल्या गावठाण सर्वे नं. 29 मधील बंजारा (लमाण) समाजाच्या घरांची नोंद 7/12 वर असून गेल्या 35 वर्षापूर्वी राहण्यासाठी घरजागा कबाल्यावर मिळावी म्हणून तहसिलदार तुळजापूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केलेले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनातील आधिका-याच्या दुर्लक्षामुळे अद्याप पर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. धुळखात पडलेल्या कबाल्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून बेघर कुटूंबियाचे पुनर्वसन करण्याची मागणी भायतीय जनता युवा मोर्चाचे नळदुर्ग शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, विशाल डुकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केले आहे.
           तीन महिन्यापुर्वी नळदुर्ग शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अक्कलकोट रोड सर्व्हे नं. 29 मधील बंजारा (लमाण) कुटूंबियांचे पक्की घरे नगरपालिकेने उध्वस्त केले. वास्तविक पाहता या लोकांची घरे पन्नास वर्षापूर्वीपासून वडिलोपर्जित कब्जेवहीवटीनुसार राहत असून न.प. प्रशासनाने घरे पाडून लमाण समाजावर मोठा अन्याय केला आहे.
अतिक्रमण मोहिमेदरम्यान नानीमाँ दर्गाह रोड, नगरपरिषद रोड, किल्लागेट (चमन) येथील घरे पाडण्यात आली. या ठिकाणी राहणारे अनेक कुटूंबांची घरे गावात आहेत. पुनर्वसन करण्याबाबत नगरपालिका बेघर कुटूंबियांची यादी तयार करीत असून त्यामध्ये न.प. पदाधिका-यांनी कर्मचा-यावर दबाव आणून बोगस नावे यादीत समाविष्ट करित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुळ बेघर कुटूंब वंचित राहण्याची शक्यता आहे.

सर्व्हे नं. 29 मधील बंजारा (लमाण) समाजाच्या घरांची नोंद 7/12 वर आहे. या कुटूंबियांनी सन 1981 पूर्वी नळदुर्ग मधील सरकारी गावठाण सर्व्हे नं. 29 मधून जागा कबाल्यावर मिळावी म्हणून तहसिलदार तुळजापूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहे. मात्र प्रशासनातील अधिका-यानी कबाल्याच्या कारवाईकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले. किमान आता तरी धुळखात पडलेले कबाल्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करुन पावसाळयापूर्वी या लोकांचे पुनर्वसन करण्याचे नमूद करून  लाभार्थी हा शासकीय कर्मचारी नसावा, त्याच्या कुटूंबियाच्या नावे न.प. हदृीत घरजागा नसावी, पूर्वी राहत असलेल्या जागेवरील जुने कागदपत्राची खात्री करुन पुनर्वसन करण्याचे म्हटले आहे. याची एक प्रत माहितीस्तव उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तुळजापूर, न.प मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. 
 
Top