उस्मानाबाद :-  केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून मागास जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असून यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज येथे केले.
     “कन्व्हर्जन्स इंटीग्रेशन ॲन्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस्” 2019 ते 2022 या कालावधीत जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयाचा आढावा केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आज घेतला. यावेळी  ते बोलत होते. 
      यावेळी आमदार सुजितसिंग ठाकूर, केंद्रीय मंत्री श्री.गोयल यांचे खाजगी सचिव प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
        जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी व संलग्न क्षेत्र, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रातील निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी या निर्देशांकावर आधारित आराखडा  संबंधित यंत्रणांनी तयार केला आहे, त्याचा आढावा केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांनी यावेळी घेतला. हा आढावा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे या बैठकीत सादर केला. 
        जिल्हयातील शाळा डिजीटल करुन वेब कनेक्टींग करुन सी.सी.टि.व्ही.कॅमेऱ्याने शाळांचे परिक्षण व नियंत्रण करणे तसेच सौरउर्जेचा वापर इत्यादी बाबींचा सविस्तर अहवाल आयोगाकडे पाठवावा. शिक्षण क्षेत्रात उस्मानाबाद पॅटर्न निर्माण करुन देशात नावलौकिक होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. गोयल पुढे म्हणाले की, जिल्हयातील विविध लोकप्रतिनिधी तसेच सीएसआर फंडाच्या माध्यमातून जिल्हयाच्या विकासासाठी  निधी उपलब्ध करुन देण्यासाठी माझ्याकडून तसेच केंद्रशासनाकडून निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. 
या बैठकीस जिल्हयातील विविध प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालयप्रमुख, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निलेश श्रींगी, तहसिलदार सुजीत नरहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, श्री. निपाणीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे, उपसंचालक श्री. चोले, कृषी विकास अधिकारी श्री. चिमणशेट्ये, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. विजयकर, राष्ट्रीय सूचना केंद्राचे श्री. कोंडेकर, प्रकल्प संचालक आत्मा श्री मलगुंडे, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री. कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्री. थोरात, श्री. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, अनिल काळे, सुधीर पाटील, नितीन भोसले आदींची  मोठया संख्येने उपस्थिती होती.  

 
Top