तुळजापूर :- नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसचे युवा अध्यक्ष राहुल गांधी यांनी वगळले. राहुल गांधींची कार्यशैली पाहता खा. राजीव सातव, खा. ज्योतीरादित्य शिंदे, खा. सचिन पायलट अशा युवा वर्गाकडे विविध जिम्मेदारी देण्यात आली आहे. यामुळे लोकसभा व विधानसभेच्या येणा-या निवडणुकीसाठी काँग्रेसची वाटचाल “युवकांना संधी” असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. हाच धागा पकडून तुळजापूर विधानसभेचा विचार केला असता वयाची ऐंशी पार केलेले तुळजापूरचे विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्याऐवजी कोणत्या युवा नेत्याचा विधानसभेसाठी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून विचार केला जावू शकतो, याबाबत मतदारसंघात युवक कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मागील तीन दशक काँग्रेसकडून विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण हा एकमेव चेहरा उस्मानाबाद जिल्हाभरासाठी परिचित आहे. तसेच 2014 विधानसभा निवडणुकीवेळी स्वत: आमदार चव्हाण यांनी “मी शेवटची निवडणुक लढवत” असल्याचे भावनिक उदगार काढले होते. आमदार चव्हाण यांची ती प्रतिक्रिया व सध्या राहुल गांधी यांचा युवा फस्ट फॉरम्युला पाहता युवकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उस्मानाबाद जिल्हयाचा मुख्य आणि मुरब्बी चेहरा म्हणून आमदार मधुकरराव चव्हाण यांचेच नाव अग्रक्रमावर येते. याची दुसरी बाजू पाहता जिल्हयात व तुळजापूर तालुक्यात दखल घेण्याइतपत काँग्रेसचे युवा नेतृत्व तयार झाले आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. याचा शोध घेतला असता आ. चव्हाण यांच्या दोन्ही चिरंजीवांचा अनुक्रमे जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण व कुलस्वामिनी सुत गिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण यांचा क्रमांक लागतो. तसेच माजी जि.प. अध्यक्ष तथा विदयमान जि.प. सदस्य ॲड. धिरज आप्पासाहेब पाटील, त्याचबरोबर गत निवडणुकीत काँग्रेसकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे यांचा नावाचा पक्षश्रेष्ठीकडून विचार होण्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगत आहेत. या युवा चेह-यांबददल थोडक्यात माहिती...
श्री सुनिल चव्हाण - या चार युवा चेह-यांपैकी सुनिल चव्हाण यांचेच नाव मागील पाच वर्षापासून तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून पुढे येत आहे. दि. 30 मार्च रोजी सुनिल चव्हाण यांचा भव्य दिव्य वाढदिवस श्री तुळजाभवानी कारखाना परिसरात मोठया थाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये व त्यानंतरही भावी आमदार म्हणून कार्यकर्त्यांत चर्चा रंगली आहे.
श्री बाबुराव चव्हाण - जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण हे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीतील व्युहरचनाकार म्हणून लोकसंमती असलेले युवा नेतृत्व आहेत. सन 2017 च्या अणदूर जि.प. निवडणुकीत त्यांनी स्वत:च्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. मितभाषी व राजकीय घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून योग्य निर्णय घेण्याच्या कल्पकतेमुळे या युवा नेतृत्वाचा विधानसभेसाठी विचार होवू शकतो. या दोन्ही चव्हाण बंधूंसाठी समान धागा म्हणून विदयमान आमदाराचे राजकीय वारसदार असण्याचाही फायदा होवू शकतो.
श्री ॲड. धिरज पाटील – विदयमान जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे चिरंजीव व सलग दोनवेळा वेगवेगळया जि.प. मतदार संघातून विजयी झालेले ॲड. धिरज पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी असताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. यामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे. विविध समाज उपयोगी कामांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. यामुळे त्यांच्याही नावाची दखल पक्षश्रेष्ठीला घ्यावी लागेल.
श्री संतोष बोबडे – माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यांनी तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती, सभापती पद भूषविले आहे. मागील वेळी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्यामुळे यावेळी त्यांच्या नावाचा विचार होवू शकतो.
एकंदरीत, आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी वरील चार युवा नेतृत्वांचा जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन विचार होवू शकतो. मागील वीस वर्षाचा विचार करता येणा-या निवडणुकीच्या रणांगणात पहिल्यांदाच युवा चेह-यांना काँग्रेसकडून संधी मिळेल किंवा नाही हे पाहणे औत्सुकत्याचे ठरेल. याबाबत उमेदवारी वाटप आणि आमदार मधुकरराव चव्हाण यांची भूमिका काय असणार याबाबत सध्या तर्क वितर्क लढवले जात आहेत.