नळदुर्ग :- येथील नव्याने विकसित झालेल्या भवानीनगर, रहीम नगर, कला शंकर नगर, रणे प्लाँटिंग येथे मुलभूत सुविधा पुरवण्याची मागणी करत या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी बुधवार दि. २५ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण केले. नळदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच मरगम्मा या भटक्या समाजातील महिला, पुरूषांनी उपोषण स्थळी नगरपालिकेसमोर पारंपारिक वाद्यावर नृत्य सादर करुन नागरिकांचे लक्ष वेधले.
मागील आनेक महिन्यापासून वेळोवेळी निवेदन, मोर्चा आदी माध्यमातून भवानी नगर, रणे प्लाँटिंग, रहीम नगर येथील नागरिकांनी या भागात चांगले रस्ते, गटारी, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, दिवाबत्ती या मुलभूत सुविधा पुरवण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. पालिकेने काही वेळा आश्वासनावर येथील नागरिकांची बोळवण केली. माञ प्रत्यक्षात या भागात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. यामुळे नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले. तत्पुर्वी रहिम नगार ते बसस्थानक मार्गे नागरिकांनी वाजत गाजत मोर्चा काढला. दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्षा वा उपनगराध्यक्षा कोणीही भेट दिली नाही. तसेच मुख्याधिकारीही यावेळी पालिकेत उपस्थित नव्हते. सचिन डुकरे, मन्सुर शेख, नेताजी महाबोले, अत्तार रहमिन कुरेशी, राजेश चंदेले, अताऊर रहेमान कुरेशी, मुत्ताहीर बाडेवाले, जाफर बागवान आदींनी यावेळी उपोषण केले. तसेच नगरसेवक बसवराज धरणे, बशिर शेख यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास १३ आँगस्ट पासून बेमुदत उपोषणाचा इशारा माजी नगरसेवक सचिन डुकरे यांनी यावेळी दिला.
फोटो ओळ : नळदुर्ग येथील नगरपालिकेसमोर उपोषणास बसलेले नागरीक