नळदुर्ग  :- मराठा आरक्षण मागणीसाठी बुधवार रोजी नळदुर्ग शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार व्यापा-यानी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन युवकांनी सामुहिक मुंडण करुन शासनाचा निषेध केला. 
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला गेटहून सकल मराठा परिवाराच्यावतीने बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये युवकांनी भगवे ध्वज घेवून जोरदार घोषणाबाजी केली.  हा मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक मार्गे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर औरंगाबाद जिल्हयात मराठा आंदोलनात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे व पोलीस बंदोबस्तादरम्यान मृत्यू झालेल्या श्याम काटगावकर यांना नळदुर्ग सकल मराठा परिवाराच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, शिवसेनचे माजी उपजिल्हाप्रमुख  कमलाकर चव्हाण, शहराध्यक्ष संतोष पुदाले, मराठा समाजाचे संदीप नरवडे, विनील जांभळे, दिपक काशिद आदींनी आरक्षण मागणीसाठी आपले विचार व्यक्त केले.
या रास्ता रोको आंदोलनात तेजस जाधव, राजकुमार मुरमे, विशाल मोटे, बबन चौधरी, शिवम नागणे, बिट्टू मुळे या युवक कार्यकर्त्यांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनास एमआयएमचे मन्सूर शेख यांनी पाठिंबा दिला.  माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी यांच्यावतीने आंदोलनकर्त्यांना फळ व पाणी वाटप करण्यात आले. महामार्गावरील केळीचे सालपट सह कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटली कार्यकर्त्यांनी बाजूला एकत्र केले. 
यावेळी गणेश मोरडे, शरद बागल, प्रवीण चव्हाण, संजय मोरे, भगवंत चौधरी, रमेश जाधव आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.  यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, अनिल खोडेवाड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

 
Top