नळदुर्ग :- वाळू उपशावर बंदी असतानाही नळदुर्ग शहर व परिसरात रात्री व पहाटेपूर्वी बेकायदेशीर हायवा ट्रकच्या सहाय्याने चोरटी वाळूची वाहतुक खुलेआम होत आहे. वाळू माफियानी शहरातील अनेक भागात वाळू उतरवून पसार होत असल्याच्या घटनेत वाढ अलीकडे दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याची वाट लागली असून याप्रकरणी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नळदुर्ग शहरातील अनेक भागात वाळूतस्करांनी वाळूचे साठे अवैधरित्या बनवून ठेवल्याचे आढळून येत आहे. वास्तविक पाहता वाळूचा साठा करुन ठेवणे हे बेकायदेशीर आहे. असे असताना नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी वाळूचे साठे आहेत. यावर कारवाई का करीत नाहीत, यामागाचे कारण समजत नाही. आज वाळूची टंचाई जाणवत असताना नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावरुन वाळू तस्करीचा धंदा मोठयाप्रमाणात सुरु आहे. या वाळू तस्काराकडे पोलीस व महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांत संतप्त भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. शासनाचा वाळू उपशावर बंदी घालण्याचा निर्णय सामान्यांना त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे माञ वाळू माफीयांचे चांगले फावले जात आहे.
अक्कलकोटहून हायवा ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरुन नळदुर्गकडे वाहतूक होत असल्याने नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याची अक्षरश: चाळण होवून मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे इतर वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवाशी, भाविकांना प्रसंगी मुक्का मार सहन करावा लागत आहे. तरी महसूल व पोलीस प्रशासनाने रात्रीची या भागात गस्त वाढवून बेकायदेशीर वाळू वाहतुकीस आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
याप्रकरणी तहसिलदार दिनेश झापले यांच्याशी संपर्क साधले असता, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कारवाई करण्यासाठी इटकळ ता. तुळजापूर येथे थांबत असून मात्र दिवसा वाहतूक होताना दिसत नाही. अशा वाहनावर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक नेमले असून त्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले.