नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतक-यांचे प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी वारंवार व्यत्यय येत आहे. मात्र त्यावर मात करुन पहाटे दोन ते पाच या वेळेत विमा भरण्यात येत आहे. गेल्या तीन रात्रीत ७१० शेतकऱ्यांचा सात लाख रुपये विमा भरणा झाला आहे. या कामी जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी स्वत: रात्रभर बँकेत ठाण मांडून लक्ष घातल्याने हे शक्य झाले.
शासनाने पीकविमा भरणा ऑनलाइन केल्यानंतर दिवसा पोर्टल व विजेचा अडसर येत असल्याने शेतकऱ्यांसह अधिकारीही वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून मध्यरात्रीनंतर पीकविमा भरणे सुरू आहे. पहाटेच्या सुमारास कर्जदार व बिगर कर्जदारांचे फॉर्म भरून घेणे व सकाळी बँकेच्या वेळेत विमा रक्कम घेऊन पावती देण्याचे काम चालू आहे. शाखाधिकारी एम. एस. चिमणे व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.