तुळजापूर :- स्वत: सह कुटूंबास स्वच्छतेच्या कामात वाहून घेतलेल्या व सामाजिक जाणिवेतून विविध क्षेत्रात समाजसेवा म्हणून काम करत असताना उच्चशिक्षित युवकाने एक वेगळाच आदर्श समाजासमोर निर्माण करत समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित असलेल्या मनोरुग्ण व्यक्ती, बेवारस, वेडसर अशा व्यक्तींना माणुसकीच्या नात्याने आधार देत पुनर्वसन करण्यासाठी धडपड करणे, कपडा बँकेच्या माध्यमातून गरजूंना मदत करणे, अपघातातील जखमींना तात्काळ मदत करणे, हरवलेल्या मुलांना चाईल्ड लाइनच्या माध्यमातून सुखरुप घरी पोहचवणे इत्यादी विविध क्षेत्रात स्वखर्चाने कुटूंबियासह धावून जाण्याचे मौलिक कार्य करत आहेत.
उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्हयात रस्त्याच्या कडेला स्वत:ची कार थांबवून एखादी भारदस्त शरीरयष्ठी असलेली व्यक्ती गोरगरीब गरजूंना कपडयांची मदत, अन्नदान करत असेल, मनोरुग्ण व्यक्तीस मदत करत असेल तर तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, कारमधील कुटूंबियासमवेत आलेली व्यक्ती एखादया मनोरुग्णास, अंगावर मळलेले कपडे असलेल्या व्यक्तीस, वृध्दास कशी काय मदत करण्याचे धाडस दाखवू शकते? कारण सामान्य माणूस अशा मनोरुग्ण, वेडसर माणसाच्या जवळ जाण्यास धजावत नाही. मग हे कारमधून उतरलेली व्यक्ती एवढे अस्थेवाईकपणे चौकशी करुन मदत करण्याचे धाडस कसे करत असेल? तर मग तुम्ही समजून जा की ही स्वार्थी जगात अशी परोपकारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून राज्यभर आपल्या सामाजिक कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील बलदंड शरीर असलेला कोमल मनाचे श्री पंकज शंकरराव शहाणे हे आहेत…
“तुळजापूर लाईव्ह” च्या टीमने पंकज शहाणे यांचा शोध घेत त्यांचे घर गाठले आणि समजला त्यांचा थक्क करणारा धक्कादायक प्रवास...
पंकज शहाणे यांचे मूळ गाव आलूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) हे असून सामाजिक कार्याची आवड असलेले त्यांचे वडील फौजदार शंकरराव शहाणे यांनी सन 1971 मध्ये फौजदारची नोकरी सोडून प्राध्यापकाची नौकरी करणे पसंत केले. पंकज शहाणे यांनाही वडिलांचा तो सामाजिक कार्याचा गुण वंशपरंपरेने त्यांच्यामध्ये आला. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव लहानपणीच पंकज शहाणे यांच्यावर पडला. रसायन शास्त्रात उच्च पदवी घेवून काही काळ एका खासगी कंपनीत नौकरी केली. मात्र तेथे त्यांचे मन रमेनासे झाले आणि मग त्यांनी सन 2006 ते 2008 या कालावधीत शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) क्षेत्रात नावलौकिक मिळवत उस्मानाबाद श्री, धाराशिव श्री यासह विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारुन अनेक पुरस्कार पटकाविले. ते सलग चार वेळा जिल्हा चॅम्पियन होते.
तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे प्रशासनावर ताण पडतो. ही बाब पंकज शहाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी कुटूंबियासह मंदीर, बसस्थानक, शासकीय कार्यालय येथे सन 2008 पासून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छतेचे कार्य करत असताना त्यांची आई सुषमा, पत्नी स्नेहल, चार वर्षाची मुलगी प्रांजल हे उत्स्फुर्तपणे सहभागी होतात. हे कार्य करत असताना अनेक ठिकाणी गरीब लोकांच्या अंगावर फाटके, मळलेले कपडे पाहून कपडा बँक ही संकल्पना सन 2012 पासून राबविण्यास सुरुवात केली. उस्मानाबाद जिल्हयात वाडी, वस्ती, गावात जावून आतपर्यंत 11 हजार गरजूंना कपडे, छत्र्या वाटप केले आहेत. कपडा बँकेच्या माध्यमातून कपडे वाटप करत असताना गरजूपैकी काही मनोरुगण आढळून आले आणि सुरु झाला वेगळाच प्रवास...
क्रमश: