तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची आषाढी एकादशी निमित्त दि. 23 जुलै रोजी श्री विठ्ठल रुपात पुजा बांधण्यात आली. श्री विठ्ठल रुपातील श्री तुळजाभवानी मातेच्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी पहाटे मंदिरात चरणतीर्थ पूजा संपन्न झाल्यानंतर मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी पूजेची घाट झाल्यानंतर देवीच्या अभिषेक पूजा पार पडल्या. अभिषेक पूजेनंतर देवीची धुपारती करण्यात आली. त्यांनतर अंगारा काढण्यात आला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून सोमवार रोजी श्री तुळजाभवानी मातेची विठ्ठलाच्या रुपात विशेष पूजा मांडण्यात आली. भोपे पुजारी अतुल मलबा, सार्थक मलबा, प्रकाश मलबा यांनी ही विशेष पूजा मांडली. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, रुपेश कदम, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. या विशेष पूजेत देवीच्या भाळावर चंदनाचा मळवट भरून त्यावर विठ्ठलाचा वैष्णव गंध रेखला होता. मस्तकावर विठ्ठलाप्रमाणे सुवर्ण मुकुट घालण्यात आला होता. नाकात रत्नजडित नथ असून प्राचीन पारंपारिक दागदागिन्यांनी देवीला मढवण्यात आले होते. तसेच एकादशीनिमित्त तुळशीच्या पानांचा हार घातला होता. सोनेरी रंगाचा जरीकाठाचा शालू देवीला नेसवण्यात आला होता. चुणीदार शालू नेसवून देवीला नेसवून श्री विठ्ठलाच्या रुपात दर्शवण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या रुपातील देवीचे अलौकिक रुप खुलून दिसत होते.