नागपूर : भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाली. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपची उमेदवारी न घेता रासपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी दि. १६ जुलैला निवडणूक होणार होती. ११ जागांसाठी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी १२ वा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती. मात्र पृथ्वीराज देशमुख यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. रासपाचे उमेदवार आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपाचे विजय गिरकर, राम पाटील-रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक, शिवसेनेचे अ‍ॅड. अनिल परब, मनिषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

 
Top