नळदुर्ग
(शिवाजी नाईक) : सर्वत्र पावसाने धुमाकुळ घालत असताना तब्बल महिनाभराच्या विश्रांती
नंतर नळदुर्ग भागात रविवार रोजी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या
पुर्वी काही भागात झालेल्या पावसामुळे व यावर्षी पर्जन्यमान चांगले आहे म्हणून शेतक-यांनी
पेरणी केलेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत
आहे.
नळदुर्ग येथे आतापर्यंत फक्त 156 मि.मी. पाऊस झाले आहे. तर रविवारी
सायंकाळी झालेल्या पावसाची 22 मि.मी. एवढी नोंद असल्याची न.प. कर्मचारी खंडेराव
नागणे यांनी सांगितले. महिन्याच्या
प्रारंभी नळदुर्ग परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे काही शेतक-यांनी खरीप हंगाम साधण्यासाठी
घाईने पेरणी उरकली. मात्र त्यानंतर पावसाने दिर्घ काळापर्यंत दडी मारुन बसल्याने पिकाची
वाढ खुंटली. त्याचबरोबर वन्यप्राण्यांनी पिके खावुन फस्त केली. तर अजुनही उर्वरित शेतक-यांनी
मोठया पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. दरम्यान, दररोज ढगाळ वातावरण असल्याने पावसाच्या
सरी आज कोसळतील या आशेने शेतकरी दिवस काढत आहेत.
वागदरी, येडोळा, खुदावाडी, लोहगाव, आलियाबाद, अणदूर गावासह
परिसरात मृगाच्या पूर्वीच पावसाने हजेरी लावली होती. शेतात उगवलेले पिक दिसू लागले. मात्र पावसाने उघडिप दिली. त्यामुळे पिक कोमेजुन जावू लागली.
काही शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी होरपळत असल्याचे दिसत आहे. अनेक शेतक-यांनी यंत्रावर शेतीची मशागत करुन महागडी बियाणे व खते घेवून पेरणी केली. वेळेवर पाऊस आला तर पिके जगतील, उतारा कमी मिळेल,
दुबार पेरणीचे संकट टळेल ही आशा बाळगून शेतकरी दिवस पुढे ढकलत आहे. ज्यांनी पेरणीच केली नाही अशांनी बियाणे, खते खरेदी करून ठेवली तर काही शेतकऱ्यांनी अद्याप खरेदीच केली नाही.
शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असून सोयाबीन, उडीद, मुग, तूर या नगदी पिकाबरोबरच हुलगा, मटकी, तीळ, बाजरी आदी पिकेही याच हंगामात येतात. त्याला बाजारात मागणी असते. तर यातील नगदी पिकाचे भुसकट जनावरासाठी पोषक असल्याने खरीप हंगाम साधण्यासाठी शेतक-याची नेहमीच लगबग असते. पाऊस लांबल्याने पेरण्या थांबल्या आहेत. पावसाने हजेरी लावली पाहिजे, अन्यथा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे.
कोट : तुळजापूर वनविभागाचे
वनपाल राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधले असता, वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
होत असेल तर संबंधित शेतक-यांनी महाफॉरेस्ट या संकेतस्थळावर शेतीचे गटनंबरसह
तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.