नळदुर्ग :- शासनाच्या ऊर्जा बचत उपक्रमांतर्गत
नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी शहरातील सर्व रस्त्यावर पथदिवे बदलून
2 हजार एलईडीचे दिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ शहरातील चावडी चौकात सोमवार रोजी
सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. या
उपक्रमामुळे संपूर्ण नळदुर्ग शहर प्रकाशाने उजळणार आहे.
शासन पुरस्कृत ईईएसएल
कंपनीच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरील सर्व पथदिवे
बसविण्याचे काम सुरु झाले आहे. ऊर्जा बचत योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 25 कोटी
रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या कामामुळे ऊर्जा बचत होवून जवळपास पन्नास टक्के वीज
बिलात मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर वार्षिक देखभाल दुरुस्तीसह सर्व कामे आगामी
पाच वर्षापर्यंत ही कंपनी विनामुल्य करणार आहे. एलईडी पथदिव्यांच्या माध्यमातून
नगरपालिकेची वार्षिक 20 लाख रुपयांची बचत होणार आहे. त्याचबरोबर
नगरपालिकेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून सदर उपक्रमाची राज्यभर
अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
सदर कार्यक्रमांतर्गत
राबविण्यात येणा-या योजनेच्या खर्चाची परतफेड ही ऊर्जा बचत न.प. चा वार्षिक
होणा-या खर्चाच्या बचतीतुन करण्यात येणार असल्याने नगरपालिकेवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही, असे मुख्याधिकारी उमाकांत
गायकवाड यांनी सांगितले.
या कार्यक्रमास
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, राष्ट्रवादीचे गटनेता निरंजन राठोड, नगरसेवक दयानंद
बनसोडे, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, संजय बताले, शब्बीर कुरेशी,
राष्ट्रवादीचे सिराज काझी, नवल जाधव, गणेश मोरडे, गौस कुरेशी, वसीम कुरेशी, पोलीस
पाटील सुर्यकांत पाटील, न.प. कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, नितीन पवार
यांच्यासह नागरीक उपस्थित होते.