सोलापूर : मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामा देण्याचे सत्र सुरूच असून आज पंढरपूर-मंगळवेढयाचे आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र देवून आपला राजीनामा पाठवला आहे.
आमदार भारत भालके यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे की, पुरोगामी शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये अस्थिरतेचे वातवरण झालेले आहे़ मराठा, धनगर, महादेव कोळी व मुस्लिम या समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळावे ही मागणी वारंवार ते करीत आहेत़. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व समाजाला लेखी व तोंडी आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही आजपर्यंत आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे़ त्यामुळे या सर्व समाजाच्या भावना तीव्र झाल्यामुळे सध्या राज्यामध्ये आंदालनाचा वणवा पेटलला आहे़ अशा परिस्थितीमध्ये त्या सर्व समाजांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या पदावर राहण्यास नैतिकता वाटत नाही, म्हणून मी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा आपल्याकडे पाठवून देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.