तुळजापूर :- शुक्रवार दि. 27 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुजाविधीच्या वेळेत बदल करण्यात आले असून ग्रहकालात मातेस सोवळयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदीर संस्थानने पत्रकाद्वारे दिली आहे.
    शुक्रवार दि. 27 जुलै रोजी गुरुपौर्णिमेदिवशी खग्रास चंद्रग्रहण येत आहे. यामुळे मातेच्या नित्योपचार पुजाविधीत बदल करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे असेल. शुक्रवार रोजी पहाटेपासून सायंकाळपर्यत नित्योपचार पूजा नियमित विधीप्रमाणे होतील. तसेच सायंकाळी साडे सहा वाजता अभिषेक पूजेची घाट होणार असून त्यानंतर निर्माल्य विसर्जन करुन रात्री साडे आठ वाजेपर्यंत मातेचे नित्योपचार अभिषेक पूजा पंचामृत शुध्द स्नान होईल. साडे आठ ते नऊ वाजेपर्यंत आरती व धुपारती होणार आहे. अंगारा काढल्यानंतर रात्री नऊ ते दहा वाजेपर्यत मातेचा पारंपारिक वाहनावरुन छबीना काढण्यात येणार आहे. प्रक्षाळ पुजा होवून रात्री दहा ते अकरा या वेळेत मंदीर बंद राहणार आहे. त्यानंतर अकरा वाजता मंदीर उघडण्यात येवून 11.20 वाजेपर्यंत मातेची चरणतीर्थ पूजा होणार आहे. रात्री 11.20 ते 11.54 या वेळेत पूजेची घाट होवून निर्माल्य विसर्जन करण्यात येईल. 11.54 पासून ग्रहणकाल प्रारंभ होत असल्यामुळे सिंहासनात जल भरुन मातेस शुभ्र श्वेत वस्त्रामध्ये ठेवण्यात येणार आहे. शनिवार दि. 28 जुलै रोजी पहाटे 3.50 वाजता ग्रहणकालाच्या समाप्तीपर्यंत श्री तुळजाभवानी माता सोवळयात राहील. ग्रहण समाप्तीनंतर मातेचे पंचामृत शुध्द स्नान व अभिषेक होवून मातेस वस्त्र, पारंपारिक दागदागिने घालण्यात येतील. शनिवार  दि. 28 जुलै रोजी सकाळी 6 वाजता नित्य पूजेची घाट होवून नेहमीप्रमाणे पूजाविधी पार पडतील.
 
Top