नळदुर्ग : महाविदयालय परिसरात व रस्त्यावर रोडरोमियोंचा वावर वाढला असून
संबंधित टवाळखोरावर कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालय प्रशासन व पोलिसांनी कडक
कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून परिसरातील ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रवेश घेण्यासाठी येत आहेत. अशावेळी महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या मुलींना पायी जात असताना हे रोडरोमिओ मोटारसायकलने कट मारणे, शेरेबाजी करणे, असे गैरप्रकार घडत आहेत. विद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढण्यापुर्वीच महाविद्यालयाने व पोलीस प्रशासनाने वेळीच कडक कारवाई केल्यास महाविद्यालय परिसर, बसस्थानक व महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गैरप्रकार व टावाळखोरीवर आळा
बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, गतवर्षी विदयार्थिनींच्या
छेडछाडी प्रकरणास आळा घालण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ
यांनी विशेष मोहीम उघडून बसस्थानक व महाविदयालय परिसरात तक्रार पेटी बसविली होती व
अचानक भेटी देवून विदयार्थिनींची विचारपूस करुन त्यांना दिलासा दिला होता. मात्र त्यांची
बदली झाल्यामुळे या मोहिमेत खंड पडला.
नळदुर्ग पोलीस
ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले यांच्याशी संपर्क साधले असता, आपण मंगळवार
रोजी महाविदयालयास भेट दिली असून यापुढे पोलीसगस्त अचानक भेटी देवून पाहणी करणार
आहे. टवाळखोरांवर पोलिसांची करडी नजर असून विदयार्थ्यांनी व युवकांनी कायदयाचे
पालन करावे, विदयार्थिनीना व महिलांना त्रास होईल असे वर्तन करु नये, रहदारीचे
नियम पाळावेत, कोणी युवक हुल्लडबाजी करताना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही.
त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी बोलताना सांगितले.