तुळजापूर : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी पालिकेत गैरहजर असल्याच्या कारणावरून अपात्र ठरवून त्यांचे नगराध्यक्षपद रद्द केल्याचा निर्णय दिला होता. परंतू नगराध्यक्षांच्या कक्षाबाहेरील त्यांचा नामफलक काढण्यात आला नव्हता. त्यामुळे नगराध्यक्षा गंगणे आता या पदावर नाहीत, हा पवित्रा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अध्यक्ष कक्षाबाहेरील नामफलकाची तोडफोड केली.
      बहुचर्चित यात्रा अनुदान घोटाळा आणि घरकुल घोटाळा प्रकरणी राजाभाऊ माने यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार आणि तक्रारीवरून तात्कालीन नगराध्यक्षा गंगणे, तात्कालीन मुख्याधिकारी, नगरसेवक, ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात अटक टाळण्यासाठी नगराध्यक्षा फरार होत्या. त्या कालावधीत त्या पालिकेत गैरहजर असल्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याची मागणी माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याच्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे यांना गैरहजेरीप्रकरणी दोषी ठरवत त्यांचे अध्यक्षपद रद्द केल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे रिक्त पदावर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत कणे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतू अध्यक्षांच्या दालनाबाहेर अद्यापही गंगणे यांचाच नामफलक असल्यामुळे मनसेकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला.
      गुरुवार दि. १२ रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमर परमेश्वर, धर्मराज सावंत, प्रमोद परमेश्वर, वेदकुमार पेंदे, राजकुमार कोरेकर, समीर शेख, रुपेश कदम, झुंबर काळदाते, अविनाश पवार,विशाल माने, महेंद्र शिंदे, अमोल शिंदे, सूरज कोठावळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पालिकेत दाखल होऊन कार्यालयीन अधीक्षक नितीन इदाते यांच्याकडे नगराध्यक्षपद रद्द झाल्यामुळे अर्चना विनोद गंगणे यांचा नामफलक त्वरीत हटवण्याची मागणी केली. मात्र मुख्याधिकारी यांचेकडून याबाबत काहीही निर्देश प्राप्त न झाल्याने आपले म्हणणे प्रशासनाला कळवून निर्णय घेऊ असे सांगितल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय पालिका प्रशासन मान्य न करत काणाडोळा करत असल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षांच्या दालनाबाहेरील नामफलकाची मोडतोड केली. तोडलेला नामफलक कार्यालयीन अधीक्षकांच्या खुर्चीवर ठेवण्यात आला.
       यावेळी बोलताना, तुळजापूर नगरपरिषद भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. कायदे धाब्यावर बसवून जनतेच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडे घालण्याचे काम येथे होत आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी संबंधित नगराध्यक्षांना अपात्र ठरवत त्यांचे नगराध्यक्षपद रद्द केले असूनही त्यांचा नामफलक अद्यापही तसाच ठेवला आहे. पालिका प्रशासन याबाबत बोटचेपी भूमिका घेऊन सारवासारव करत आहे. प्रभारी नगराध्यक्षांची नियुक्ती होऊनही पूर्वीचाच नामफलक ठेवण्यात आला असल्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत असे सांगत, प्रशासनाच्या बोटचेप्या धोरणाचा अमर परमेश्वर यांनी निषेध केला.
 
Top