तुळजापूर : परळी (जि. बीड) येथील मराठा क्रांती मोर्चाबाबत निवेदन देण्यासाठी तुळजापुर तहसिलदाराच्या कक्षात सकल मराठा समाज बांधव गेले असता उपविभागीय अधिकारी यांनी अरेरावाची भाषा बोलून अपमानास्पद वागवणुक दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवार रोजी सकल मराठा बांधवांनी तुळजापुर येथे रास्ता रोको आंदोलन करुन संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.
तुळजापुर येथे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी अपमानास्पद वागवणुक दिल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजबांधवांनी शुक्रवार रोजी तुळजापूर बंदची हाक देत शिवाजी पुतळ्यापासून शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला. यावेळी गाढवाच्या गळ्यात निषेधाचे फलक अडकवून धिंड काढण्यात आली. येथील शिवाजी पुतळ्यापासून सकाळी १० वा. सुरु झालेला मोर्चा शिवाजी चौक, आंबेडकर चौक, भवानी रोड, तुळजाभवानी मंदीर, आर्य चौक, कमानवेस, मंगळवार पेठ येथून शेकडोंच्या संख्येने मोर्चा बसस्थानकाजवळील चौकात दाखल झाला. तेथे निवेदन देताना उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी मराठा समाजबांधवांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध व्यक्त करून त्यांना त्वरीत निलंबित करावे अशी मागणी केली. यावेळी बसस्थानकाजवळील चौकात रस्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी गिरासे यांना निलंबित करावे या मागणीचे निवेदन यावेळी तहसीलदार दिनेश झांपले यांच्याकडे वरीष्ठ अधिकारी आणि प्रशासनाकडे पाठवण्यासाठी सुपूर्द करण्यात आले.