उस्मानाबाद : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा हप्ता ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे़, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही केवळ कर्जदारच नव्हे तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचाही विमा भरून घेण्याचे आदेश दिले आहेत़, बँक अधिकाऱ्यांनी टाळाटाळ व आपले सरकार सेवा केंद्र, नेट कॅफे चालकांनी जादा पैसे आकारल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़, पीक विमा भरण्यातील अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले़.
पीकविमा भरणा मोहिमेच्या जनजागृतीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे आज (दि़२०) जिल्ह्यातील पहिला शेतकरी मेळावा घेण्यात आला़ यावेळी ११ हजार वृक्षाचे वितरण व लागवड कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी गमे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़. तसेच ग्रामपंचायतीच्या आपले सरकारमधील पीकविमा भरणा केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले़. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री़ उमेश घाडगे, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, वन विभागाचे उपसंचालक ए़ व्ही़ बेडके,उपविभागीय वन अधिकारी श्री़. अशोक पवार, तहसिलदार सुजित नरहरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश देवगिरे, दलितमित्र पांडूरंग कठारे, सोपान कोल्हे, सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्री देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, सुजित बाकले, ओडीएसफ ॲग्रो प्रोड्यसूर कंपनीचे एमडी अमोल रणदिवे, लिंबराज मसे, सुधाकर देवगिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़.
जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले, शेतकऱ्यांना पिक विमा भरणा मोहिमेच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात गावोगावी शेतकरी मेळावे घेण्यात येत आहे़त. या मेळाव्याचा शुभारंभ शुक्रवारी सारोळा गावातून झाला आहे़. मेळाव्यात पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे़. काही दिवसापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेसह डीसीसी बँकेने केवळ कर्जदार शेतकऱ्यांचाच विमा हप्ता स्विकारणार असल्याचे जाहीर केले होते़, मात्र राष्ट्रीयकृत बँकेसह डीसीसी बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना बिगर कर्जदार शेतकऱ्यांचाही विमा भरून घेण्याचे आदेश दिले आहेत़. मात्र बँकांनी विमा घेण्यास टाळाटाळ केल्यास शेतकऱ्यांनी थेट टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविल्यास त्या बँकावर कारवाई करण्यात येईल़. ग्रामपंचायतीच्या आपले सरकार केंद्रात मोफत विमा भरला जाणार आहे़ तर नेट कॅफेमधून ३० रूपयापेक्षा जादा शुल्क आकारल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत़. पीक विमा भरण्यात काही अडचणी येत आहेत़ मात्र त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़. तलाठ्यांनाही शेतकऱ्यांना मोफत सातबारा, ८ अ देण्याचे आदेश दिले आहेत़. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनाही पीक विमा भरण्याच्या कामात सतत दक्ष राहावे़ ,कामात कुणीही कुचराई करू नये़, शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येवू नयेत यासाठी प्रशासन सर्वेातोपरी प्रयत्न करत असल्याचेही जिल्हाधिकारी गमे म्हणाले़.
जिल्हाधिकारी गमे यांनी शेत रस्त्यासाठी निधी देणार,शेत रस्ते ही शेतकऱ्यांची अत्यंत गरजेची बाब आहे़. शिवार रस्ते व शेत रस्त्यासाठी मोठे वाद-विवाद होत आले आहेत़ तसेच शेती उत्पन्नावेळीही शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे़. सारोळा येथील शिवार रस्त्यांसह शेतरस्त्यांचे प्रस्ताव दाखल करावेत़. पालकमंत्री शेतरस्ते योजनेसह रोहयोमधून कामे करण्यात येतील़ असे सांगून गावातील एक शिवार रस्त्याच्या मजबूतीकरणासाठीही येत्या काही दिवसात निधी देणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री़. गमे म्हणाले़.
जिल्हाधिकारी श्री. गमे थेट डीसीसी बँकेच्या शाखेत दाखल झाले.मेळावा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गावातील डीसीसी बँक विमा हप्ता भरून घेत नसल्याची तक्रारी केल्या त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याची तातडीने स्वत: दखल घेवून थेट गावातील डीसीसी बँकेत जावून अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़. गोरगरीब शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरून घेण्यास मदत करा, अशा सक्त सूचना दिल्या , त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे़.
सारोळा गावात वनविभागाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे़. ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा उत्साह पाहून वनविभागाच्या वतीने सारोळा गाव दत्तक घेवून वृक्ष लागवडी मोहिम राबविण्यात येणार आहे़. यासाठी जास्तीत जास्त विविध प्रकारची रोपटी देण्यात येतील, अशी ग्वाही विभागीय वन अधिकारी श्री़. सातेलीकर यांनी दिली.
यावेळी रामकृष्ण देवगिरे, महावीर देवगिरे, रमेश रणदिवे, पांडूरंग नाडे, लक्ष्मीबाई शिंदे, मनिषा काकडे, उज्वला देवगिरे, संगिता गुरव, उषा वाघ, सिंधूबाई धावारे, नामदेव खरे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, पांडूरंग कुदळे, दादा गाढवे, बबलू रणदिवे, जीवन बाकले, दत्तात्रय कावळे, सुनिल जगदाळे, शाहरूख सय्यद आदींसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.