मागील काही वर्षापासून उस्मानाबाद जिल्हयात प्रशासकीय अधिका-यानी चांगलाच उच्छाद घातला असुन शासनाच्या धोरण विरोधी भुमिका घेवुन सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचा प्रकार नेहमी घडताना दिसत आहे. देशातील अतिमागास जिल्हयाच्या यादीत तिस-या क्रमांकावर असलेल्या उस्मानाबादचे नाव पहिले येण्यापासून रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा बदलणे गरजेचे आहे. जिल्हयातील जनतेतुन एकही प्रतिनिधी निवडून न आलेल्या राज्यातील व केंद्रातील सत्ताधा-यांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र अजूनही वेळ गेलेली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया जिल्हावासियांतून उमटत आहे.
उस्मानाबाद जिल्हा हा अतिमागास राहण्यामध्ये जेवढा दोष जिल्ह्यातील राजकारण्यांचा, पुढाऱ्यांचा, मंञ्याचा, आमदार-खासदारांचा असून तेवढाच दोष किंबहुना त्यापेक्षाही जास्त दोष हा विविध विभागातील मुजोर शासकीय अधिकाऱ्यांचा असल्याची गंभीर भावना नागरिकांत आहे. मात्र कुणीही लक्षात घेत नसल्याचे दिसून येत आहे. माञ तरीही यामुळे प्रामाणिक, सामान्यांच्या हिताची तळमळ आसलेले बोटावर मोजण्याइतपत अधिकारी आहेत. जिल्ह्यातील काही मुजोर शासकीय अधिका-यामुळेसुद्धा आनेक कामे खोळंबने, शासनाबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार होणे व यामुळे अविकसित असण्याचा कलंक लागणे या गंभीर बाबी अलीकडच्या काळात घडत आहेत. मागील काही वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शासकीय आधिका-यांच्या चुकीमुळे, गैर कारभारामुळे, गैर वर्तनुकीमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी झाली आहे. यामध्ये मुख्यता महसुल, पोलीस, शिक्षण, न.प. प्रशासन, कृषी या खात्यातील प्रकरणे चटकन डोळ्यासमोर येतात. या विषयावर गावच्या पारावर आजही चर्चा ग्रामस्थांत रंगत आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या श्रीक्षेत्र तुळजापूर येथील सर्वाधिक चर्चिले गेलेल्या यात्रा अनुदान, घरकुल घोटाळा, लाच प्रकरणामुळे तीन मुख्याधिका-यांची बदली, बडतर्फ व कारावासाच्या दुर्दैवी घटना घडल्या. तसेच कळंब येथील वादग्रस्त मुख्याधिका-यावर गुन्हा दाखल झाला. काही नगरपालिकेतील वादग्रस्त कारकिर्दीमुळे या मुख्याधिका-यास इतर नगरपालिकांनी रुजू करुन घेण्यास विरोध दर्शविल्यामुळे सध्या मंत्रालयात उचलबांगडी झाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अब्रुचे धिंडवडे काढणा-या फुलवाडी ता. तुळजापूर येथील दरोडयावर दरोडा प्रकरण देशभर गाजले होते. नुकतेच एका पोलीस उपनिरीक्षकानी स्वत:ची पिस्तुल अल्पवयीन मुलाच्या हाती दिल्याचे सोशल मिडियावर फोटो व्हायरल झाले होते. विविध विभागात लाचलुचपतच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे सर्वश्रुत आहे. कळंब येथील स्वस्त धान्य दुकानास माल पुरवठा करणा-या गोदाम प्रकरणानेही पुरवठा विभागात खळबळ उडवून सर्व ठिकाणच्या गोदामपालाची बदली करण्याची नामुष्की ओढावली. तुळजापूर तालुक्यातील कृषी विभागाच्या गैरकारभारामुळे काही अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिका-याचे प्रकरण चव्हाटयावर आल्याने जिल्हयातील शिक्षण विभाग नापास झाले. जिल्हयात मराठा आरक्षण प्रकरण चिघळण्यास कारणीभूत ठरलेले तुळजापूर येथील उपविभागीय अधिका-याचे मुजोर वर्तन प्रशासनाला सध्या जड जात आहे. महावितरणचा सामान्यांच्या डोक्याला आर्थिक शॉक देवून भांडावून सोडल्याने घरोघरी सौर पॅनेल उभारण्याच्या मानसिकेत जिल्हावासिय आहेत.
जनतेनी दिलेले निवेदने, तक्रारी याची दखल संबंधित प्रशासकीय यंत्रणेने न घेतल्यामुळे मोठयाप्रमाणावर लोक आयुक्त, राज्य मानवी हक्क आयोग, राज्य पोलीस प्राधिकरण यासह मंत्रालयातील संबंधित खात्याच्या विभागात आणि औरंगाबाद खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयात अनेक प्रकरण नागरिकांकडून दाखल आहेत. या व्यतिरिक्त झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे इतर विभागातील अनेक गैरप्रकार गुलदस्त्यात असल्याची कुजबुज जिल्हावासियात आहे.