सोलापूर : आषाढी एकादशीची ब्रह्ममुहुर्तावर होणारी शासकीय महापुजा यंदा मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीच सुरु झाली. दर्शनाच्या रांगेतील वारकरी दांपत्य अनिल आणि वर्षा जाधव यांच्या हस्ते पहाटे २:३० वाजता पूजा सुरु झाली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे ही पुजेत सहभागी झाले आहेत. आषाढीला शासकीय पूजेची परंपरा सुरु झाल्यापासून शासनाचा मंत्री किंवा त्यांचे सचिव यांच्या हस्ते पूजा न होण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. यावेळी गाभाऱ्यात जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थिती होते.
पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराजंच्या काळात व पुढे पेशव्यांच्या काळातही ही शासकीय पूजा होत होती. पुढे मंदीरातील विठ्ठलाचे पुजारी असलेले बडवे आणि रुक्मिणीचे पुजारी असलेले उत्पात यांच्या ताब्यात मंदिर गेल्यावर त्यांच्याच हस्ते पुजा व्हायच्या. मात्र १९७३ ला राज्य सरकारच्या ताब्यात मंदिर आल्यावर मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीला शासकीय पुजा होण्यास सुरवात झाली. शिवसेना- भाजप युतीच्या काळात राज्याला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुजेची परंपरा सुरु झाली. मात्र डाऊ कंपनीवरुन वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना पूजा करु न देण्याची भुमिका बंडातात्या कराडकर यांनी घेतलली व ते पुजेला आले नाहीत. त्यावेळी तत्कालीन कॅबीनेट मंत्री बबनराव पाचपूते यांच्या हस्ते पूजा झाली होती. त्या आधीही एकदा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना पूजेला उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्यांच्याच सचिवांनी (आयएएस अधिकारी) त्यांचे प्रतिनिधीत्व केले आणि शासकीय पूजा पार पडली होती. मात्र यंदा पहिल्यांदाच राज्यातील कोणत्याही मंत्र्याची उपस्थिती नसताना वारकऱ्याच्या हस्ते ही शासकीय पूजा झाली.
मराठा आरक्षणाबाबत सुरु झालेले आंदोलन आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करु देणार नाही अशी आंदोलकांनी घेतलेली भुमिका यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरात न येण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मंत्री गिरिष महाजन आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाही पंढरपूर पासून लांब मंगळवेढा नाक्यावरच आंदोलकांनी आडवले त्यामुळे त्यांनाही आषाढीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांच प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही. सध्या पूजा सुरळीत पार पडली असून आंदोलकांनीही पूजेत कोणताच व्यत्यय आणला नाही.
साभार - पुढारी ऑनलाईन