नळदुर्ग :- पालिकेत सत्तेत असणा-या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या तमाशामुळे शहरवासियांना नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडुन दिल्याचा आज पश्चाताप होत आहे. कारण सत्तेत आल्यानंतर शहराचा विकास करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आपल्याच नगरसेवकांचे व नेत्यांचे वाभाडे काढत आहेत.
नळदुर्ग नगरपरिषदेच्या सन 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरवासियांनी काँग्रेस पक्षाला सत्तेवरुन खाली खेचत नगरपरिषदेची सत्ता नळदुर्गचे सुपुत्र व राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. या निवडणुकीत नगराध्यक्षासह 17 पैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले. केवळ शहराच्या विकासासाठी व नळदुर्ग शहरातुन समोर आलेले अशोक जगदाळे यांचे एक राजकीय नेतृत्व यामुळेच शहरवासियांनी राष्ट्रवादीला निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमापोटी नव्हे तर अशोक जगदाळे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शहरवासियांनी हा बदल केला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने शहराचा विकास करण्याऐवजी गेल्या दीड वर्षात शहरवासियांचा फक्त विश्वासघात केला. सध्यातर अशी परिस्थिती आहे की, नगरपरिषदेमध्ये बहुमतामध्ये असणारी राष्ट्रवादी काँग्रेस आज अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत आला आहे. राष्ट्रवादीच्या शाहीन मासुलदार या कशाबशा नगराध्यक्षांच्या निर्णायक मतदारावर निवडुन आल्या आहेत. सध्या तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जो तमाशा सुरु आहे त्यावरुन शहरवासियांना राष्ट्रवादीला निवडुन दिल्याचा मोठा पश्चाताप होत आहे. ज्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शहरवासियांनी निवडुन दिले त्या नगरसेवकांनी शहराचा विकास करण्याऐवजी आपल्याच नगरसेवकांचे वाभाडे काढीत आहेत. आज राष्ट्रवादीचे नगरसेवक उदय जगदाळे, अंबुबाई दासकर, भारती बनसोडे, छमाबाई राठोड हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत का नाही याबाबत संशय आहे.
अशोक जगदाळे यांनी शहरवासियांच्या विश्वासाला पात्र राहुन गेल्या दीड वर्षात शहराचा विकास करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे न केल्याने नागरीक त्यांच्यावर नाराज आहेत. अशीच परिस्थिती राहीली तर जगदाळे यांचे नेतृत्व शहरवासिय जुगारुन देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर जगदाळे यांना शहरात विकासाचे कामे करावीच लागतील. नाहीतर पुन्हा शहरवासिय दुसरा पर्याय शोधल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या बारा नगरसेवकांना जगदाळे यांना एकत्रित ठेवता आले नाही. त्यामुळे जगदाळे यांनी येणा-या काळात शहराचा विकास करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग चांगला करुन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच चावडीची इमारत बांधण्याबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही जगदाळे यांना सोडवावा लागणार आहे.
- विलास येडगे, नळदुर्ग