काटी :- सध्या मराठवाडय़ात खरीप हंगामातील पीक विमा घेण्यास विमा कंपनीने चालू केले आहे. खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धावपळ सुरु आहे. परंतु सर्व्हर डाऊन , इंटरनेट बंदमुळे सात बारा, आठ ' अ' निघत नसल्याने शेतकऱ्याची पुरती कोंडी झाल्याचे चित्र सेतू सेवा केंद्रावर दिसून येत आहे. पीकविमा भरण्यासाठी लागणारा सातबारा व आठ 'अ' तसेच बँक पासबुक ,आधार कार्ड, पिक पेरा स्वघोषणापत्र इत्यादीची सक्ती केली आहे तसेच कर्जदार शेतकरी यांना 31 जुलै व बिगर कर्जदार यांना 24 जुलै ची मुदत दिली आहे.मुदतीत विमा भरण्यास शेतकरी सेतू सुविधा केंद्र,महा ई सेवा केंद्र, संगणकीय केंद्र आदी ठिकाणी गर्दी करत आहेत परंतु शनिवार पासून काटीसह सावरगाव, सुरतगाव, तामलवाडी आदी गावातील सेतू सेवा केंद्रावर सातबारा व आठ 'अ ' निघत असलेल्या पोर्टलला तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाल्याने शेतकरी परेशान झाले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बिगर कर्जदार शेतकरी लोकांची मुदत 7 दिवसावर येऊन ठेपली आहे व ऑनलाइन सर्वर दिवसभरातून ठराविक वेळ चालू असते. त्याच बरोबर साईट खुप स्लो चालू राहते तसेच कधी कधी पोहच पावती वर शेतकऱ्यांचे नाव, गांव ,क्षेत्र व भरना इत्यादी माहिती येत नाही अशा अनेक तांत्रिक अडचणी बरोबरच हा ऑनलाइन भरलेला विमा सक्सेस होतो का नाही अशी भिती महा ई सेवा चालका सोबतच शेतकरी यांना वाटत आहे.7/12 व 8 'अ ' साठी शेतकरी चक्क सकाळ पासून रात्री पर्यंत सेतू सेवा केंद्रावरच बसून आहेत. डिजिटल इंडियाचे स्वप्नरंजन सुरु असताना पिक विमा भरण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत हातात कागदपत्राचे भेंडोळे, लांबलचक रांगेत, त्यातच पाऊसाची रिपरिप त्यामुळे सापडेल त्या जागेत , उपाशीपोटी ताटकळत काटी, सावरगाव, सुरतगाव, तामलवाडी येथील शेतकऱ्यांना बसावे लागत आहे. पीक विमा भरण्याची मुदत जवळ येत असल्याने शेतकऱ्यांची घालमेल होत असून सर्व्हर डाऊन, इंटरनेट बंदच्या समस्येने शेतकरी ग्रासले असून या तांत्रिक अडचणीतून शेतकऱ्यांची सुटका कधी होणार? प्रशाशन कधी दखल घेणार ? व शेतकऱ्यांच्या अडचणी कधी दूर करणार? या वेड्या अपेक्षा धरून शेतकरी तासनतास सेतू सेवा केंद्राबाहेर ताटकळत वाट पाहत आहेत. सर्व्हर डाऊन, वेबसाइट बंद, इंटरनेटची स्पीड अत्यल्प त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी काटीसह सावरगाव, सुरतगाव, तामलवाडी परिसरातील शेतकऱ्यामधून होत आहे.