नळदुर्ग : जळकोट ता. तुळजापूर येथील दोघानी बेकायदेशीर सावकारी धंदा करुन व फसवणूक करून घरजागा, शेतजमीन व प्लॉट तिघांकडून बळकावल्या प्रकरणी दोन सख्ख्या     सावकार भावा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अद्याप आरोपीस अटक करण्यात आले नाही.
     तुकाराम कुशाबा कदम, महावीर कुशाबा कदम (दोघे रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी सहाय्यक निबंधक सहकार आधिकारी प्रशांत शहारपूरकर यांनी वरील आरोपींविरुध्द  नळदुर्ग पोलिसात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केली.
     मोनाबाई लोकू राठोड (रा. बोरमन तांडा, जळकोट, ता.तुळजापूर), विनायक शिवराम पोतदार (रा.जळकोट, ता. तुळजापूर), अशोक नारायण जाधव (रा. बाभळगाव, ता. तुळजापूर) या तिघांनी अनुक्रमे शेत, प्लॉट व घरजागा बळकावल्याप्रकरणी तक्रार  उपनिबंधक सहकारी संस्था तुळजापूर येथे केली होती.  सदर तक्रारीची चौकशी केली असता तुकाराम कदम यांनी मोनाबाई राठोड यांच्यावर 2002 ते आजपर्यंत सावकारी करुन त्यांची शेतजमीन हडपली आहे. तसेच विनायक पोतदार यांना 2018 मध्ये सावकारीचे पैसे देवून त्यांचा जळकोट येथील प्लॉट हडपला आहे. तर महावीर कदम यांनी अशोक जाधव यांना 2008 मध्ये सावकारी करुन त्यांची नळदुर्ग येथील घरजागा बळकावली आहे. याप्रकरणी मंगळवार रोजी दोघा सावकारांविरुद्ध दाखल झाला असून अद्यापपर्यंत आरोपीना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.डी. राडकर, ए.पी. खोडेवार हे करीत आहेत.
 
Top