तुळजापूर :- मागील चार पंचवार्षिक तुळजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षाच्या माध्यमातून सर्व विरोधक उमेदवारांना जेरीस आणणारे व थोडक्यात विजयापासून दूर राहिलेले उमेदवार म्हणून देवराज मित्र मंडळाचे सर्वेसर्वा देवानंद रोचकरी यांनी पाचव्यांदा आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवण्याची जोरदार तयार केली असून त्यादृष्टीने तुळजापूर येथे नुकतेच शेतक-यांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
मागील चार निवडणुकीमध्ये देवानंद रोचकरी यांना विजयाने हुलकावणी दिली. मात्र आपल्या लढाऊ वृत्तीमुळे रोचकरी हे तुळजापूर तालुक्यात "बाजीगर" ठरले. सन 2004 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या साडे तीन हजार मतांमुळे रोचकरी हे विजयापासून थोडक्यात दुर राहिले. मात्र त्यांच्या या निवडणुकीतील प्रचार यंत्रणेमुळे व मिळविलेल्या मतांमुळे त्यांच्या नावाचा डंका दिल्लीपर्यंत समाजवादी पार्टीच्या पक्ष श्रेष्ठीपर्यंत पोहचला होता. त्यावेळी अभिनेते राज बब्बर यांनी देवानंद रोचकरी यांची पाठ थोपटून कौतुक केले. त्याचबरोबर एका पंचवार्षिक निवडणुक पूर्वी तिकीट मागणी दरम्यान शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन प्रकरण सर्वत्र गाजले होते. याची चर्चा संबंध महाराष्ट्रभर झाली. चारवेळा वेगवेगळया पक्षाकडून निवडणुक लढवून सुध्दा त्यांचे मतदार कमी झाले नसल्याची प्रतिक्रिया आजही कार्यकर्ते देत आहेत. यावरुन त्यांच्या लोकप्रियतेची जाणीव होते.
तालुक्यासह जिल्हयात गावोगावी देवराज मित्र मंडळाच्या शाखेच्या माध्यमातून ते सामान्यांशी संलग्न आहेत. त्याचबरोबर तुळजापूर येथे आठवडयातून एक दिवस "जनता दरबार" भरवून सामान्यांच्या अडचणी दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य रोचकरी हे आजही करताना दिसत आहेत.
रोचकरी यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली होती. विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सन 1999 साली लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जोरदार मुसंडी मारत तिस-या क्रमांकापर्यंत झेप घेतले. त्यानंतर पुन्हा सन 2004 ला समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असताना विजयाच्या समिप पोहचत त्यांनी दुस-या क्रमाकांची मते घेतली. त्याचबरोबर सन 2009 व 2014 मध्ये अनुक्रमे शेकाप व मनसे या पक्षाकडूनही निवडणूक लढवली.
सन 2019 च्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी ते भाजपाकडून इच्छुक असून त्यादृष्टीने मेळावे घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. नुकतेच इटकळ येथे झालेल्या मेळाव्यात रोचकरी यांनी डीसीसी त सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिका करत यावेळीही निवडणुकीच्या आखाडयात उतरण्याचा मनोदय व्यक्त करुन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.
![]() |
देवानंद रोचकरी |