नळदुर्ग :- प्रधानमंत्री  पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 24 जुलै असून संकेतस्थळ सुरळित चालत नसल्याने  विम्याचा अर्ज भरण्यास शेतक-यांना अडचण येत आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यास मुदतवाढ देवून पीक विमा ऑफलाईन भरण्यास परवानगी दयावी, अन्यथा  आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद घोडके यांनी दिला आहे. दरम्यान, सोमवार दि. 23 जुलै रोजी अणदूर ता. तुळजापूर येथे तालुक्यातील जवळपास तीनशे शेतकरी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आपले ग-हाणे मांडण्यासाठी एकत्रित जमले होते.
      शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पीकविमा भरण्यासाठी त्रास होत असून मुदतवाढ मिळावी व ऑनलाइन न घेता ऑफलाईन पीकविमा भरण्याची मागणी अधिवेशनात केली असल्याची माहिती माजी मंत्री तथा तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दिली. बिगर कर्जदार पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 24 जुलै आहे जिल्हा बँकेपुढे तर जत्राचे स्वरूप आहे , वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली आ. चव्हाण यांच्या घरासमोर तक्रार मांडण्यासाठी शेतकरी जमले होते.
      अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेपासून आ चव्हाण यांच्या घरापर्यंत शेतकरी गेले, आ चव्हाण यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या समस्या एकूण घेतल्या, जिल्हाधिकारी, मंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री, यांच्याशी शेतकऱ्यासमोरच दूरध्वनीवरून संपर्क साधला. तहानभूक विसरून रात्रभर विधिमंडळात बाकावर झोपून शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची खंत मुख्यमंत्र्यासमोर मांडली, मात्र मुख्यमंत्र्यांनी उडवा उडावीची उत्तरे दिली, म्हणणे नीट ऐकूनही घेतली नसल्याचे खंत चव्हाण यांनी व्यक्त केली, 
शेतकरी संघटनेचे नेते यांनी आ चव्हाण यांच्या प्रयत्नांवर आपला विश्वास असून दोन दिवस काय होते ते पाहू अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले.

 
Top