तुळजापूर :- महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून त्याचबरोबरच महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे अपुर्ण  राहिल्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना आमदार मधुकरराव चव्हाण यांनी त्वरित काम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.
     तुळजापूर तालुक्यातुन गेलेला सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ या महामार्गाची अनेक कामे  अर्धवट असून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबात आमदार चव्हाण यांनी अधिवेशना दरम्यान तारांकित प्रश्न विचारलेला होता. तेंव्हा महसुलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. यामुळे प्रकल्प संचालक कदम यांनी कार्यकारी अभियंता तोडकरी यांना पाहणी करून अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी तोडकरी यांनी तालुक्यातील तामलवाडी, सुरतगाव, सिंदफळ व आपसिंगा येथील अपूर्ण कामांची पाहणी केली. 
 
Top