नागपूर :- रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी झाली असल्यास त्या नात्यातील अन्य व्यक्तीला जात पडताळणीसाठी कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. जी जात पडताळणी समिती अशा प्रकारे नव्याने कागदपत्रांची मागणी करीत असेल शासन त्यावर गांभिर्याने कारवाई करेल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री.कांबळे म्हणाले, वडिलांची जात पडताळणी झाली असल्यास त्यांच्या मुलाला किंवा मुलीला पडताळणीच्या वेळेस नव्याने कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. रक्त नात्यातील प्रत्येक व्यक्तीला पडताळणी मिळाली पाहिजे. असे करताना नव्याने कागदपत्रांची मागणी करीत असल्यास शासन त्यावर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा जात पडताळणीच्या उपायुक्त यांच्या विरोधात शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात चौकशी सह सचिवांमार्फत केली जाईल. या उपायुक्तांची बदली समितीवरुन तातडीने केली जाईल, असेही श्री.कांबळे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाग घेतला.