नळदुर्ग येथील कृषी मंडळ कार्यालय कामकाजाच्या वेळेत बंद असल्याचे दिसत आहे
नळदुर्ग : येथील कृषी मंडळ कार्यालयातील कर्मचा-याच्या मनमानी कारभारामुळे शेतक-यांना शेती मागदर्शनासाठी व इतर कामाकरीता वारंवार चकरा मारुनही भेट होत नाही. कार्यालयात सेवक सोडले तर कुणीही कर्मचारी जागेवर राहत नाहीत. निष्क्रीय कर्मचा-याच्या कारभाराची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतक-यांतुन केली जात आहे.
नळदुर्ग येथे पाटबंधारे कार्यालयाच्या पाठीमागे कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय आहे. या मंडळांतर्गत मुर्टा, लोहगाव, सिंदगाव, येडोळा, चिकुंद्रा, मानेवाडी, आलियाबाद, सलगरा (दि), शिवकरवाडी, गुजनूर, सिंदगाव, इंदिरानगर आदी गावाचा समावेश आहे. मात्र या कार्यालयाकडे कृषी सहाय्यक कार्यालयीन कामाच्या वेळेत फिरकत नसल्याने शेतक-यांची मोठी अडचण होत आहे. या कार्यालयात अनेक वर्षापासून काही कृषी सहाय्यक एकाच ठिकाणी कार्यरत असून शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतक-यांपर्यंत पोहचणे गरजेचे असताना आपल्या मर्जीतील धनदांडग्या शेतक-यांना लाभ मिळवून देण्यासाठी खटाटोप करीत असल्याची तक्रार अल्पभुधारक शेतक-याची असून अशा कर्मचा-याची तात्काळ बदली होणे गरजेचे आहे.
कृषी विभागाच्या अनेक योजनांचा गरजू शेतक-यांना लाभ मिळवून देण्याऐवजी काही कृषी सहाय्यकानी आपल्या मर्जीतील तसेच बडया शेतक-यांना लाभ मिळवून देवून त्यांच्याकडून बक्षीस मिळवण्यात धन्यता मानत असल्याचे बोलले जात आहे. खरीप पेरणीसाठी काही आठवडयापूर्वी शेतक-याना बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तर अनेक शेतक-यांना बियाणे घेण्यासाठी परमीट देण्यात आले. संबंधित गाव पुढा-यांना हाताशी धरुन कृषी कर्मचा-यांनी आपल्या मर्जीतील व धनदांडग्या शेतक-यांना बियाण्यांचे वाटप करुन गरजू, अल्पभूधारक, गरीब शेतक-यांवर अन्याय केल्याची तक्रार नगरसेवक शहबाज काझी यांनी सांगून संबंधित कर्मचा-याची या ठिकाणाहून इतर ठिकाणी बदली करावी अन्यथा कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा काझी यांनी दिला आहे.
    याप्रकरणी तुळजापूर तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक नूतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, नळदुर्ग मंडळ कार्यालयास 11 परमीट बुक त्यात प्रत्येकी 50 याप्रकरणी 550 पावत्याचे परमीट दिल्याचे सांगून तूर 4 क्विंटल, सोयाबीन 60 क्विंटल, ज्वारी 1 क्विंटल, मूग अडीच क्विंटल, उडीद 3 क्विंटल, बाजरी 3 क्विंटल ‍बियाणे तर पिकावर औषध फवारणीसाठी जैवीक संघ सोयाबीन 50 लिटर, मुग 5 लिटर, उडीद 5 लिटर, सोयातूर 50 लिटर, बाजरी अडीच लिटर आदी देण्यात आले.
  कृषी मंडळ अधिकारी योगेश खाडे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यानी भ्रमणध्वनी बंद ठेवला होता. 
 
Top