उस्मानाबाद :- प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा हप्ता ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 24 july 2018 व कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2018 आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास गर्दी तसेच नेटवर्क कंजक्शन यासारख्या अडचणींमुळे त्रास होतो.असा त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत.
       जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी शेतकऱ्यांनी बँकांमार्फत तसेच "आपले सेवा केंद्रा"मार्फत ऑनलाइन पद्धतीने pmfby.gov.in या वेबसाईटवर पिक विमा हप्ता भरावा तसेच पिक विमा हप्ता भरून घेण्यास बँका जर टाळाटाळ करत असतील तर शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांसाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या कार्यालयात दूरध्वनी क्र. 02472 223 415 आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी दूरध्वनी क्र. 02472 222 815 याबरोबरच गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
          महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख ,कार्यक्षम,गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाने महाराजस्व अभियान राबविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.या अभियानांतर्गत जनतेला विविध शासकीय उपक्रमांची माहिती देण्याच्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावात मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमध्ये खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीनेही जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सातबारा तात्काळ मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
         तलाठी,मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांनी ऑनलाइन पद्धतीने पीक विमा हप्ता व अर्ज स्वीकारणार्‍या बँका तसेच आपले सरकार सेवा केंद्रांवर भेटी देऊन या केंद्रांवर पिक विमा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीत काही अडचणी येत आहेत का किंवा कोणतेही शुल्क आकारले जात नाही ना याची खात्री करावी, विमा अर्ज भरताना काही तक्रारी आल्यास त्या तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि नेट कॅफे मधून रुपये 30 पेक्षा जास्त शुल्क आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी,प्रत्यक्ष भेटीच्या वेळी बँकांकडे शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन कार्यवाही न करता तसेच पडून असल्यास त्यांच्याविरुद्ध लागलीच कायदेशीर कारवाई करावी आणि आपले सरकार सेवा केंद्र मध्ये ७/१२ करिता नियमित शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेतली जात असल्यास किंवा पिक विमा अर्ज ऑनलाईन भरतेवेळी शुल्क घेतले जात असल्यास संबंधिताविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे सक्त आदेशच संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
           याबरोबरच श्री.गमे यांनी पिक विमा हप्ता ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी जनजागृती व्हावी याकरीता तालुक्यातील सर्व गावांमध्ये येत्या तीन दिवसात तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी,गटविकास अधिकारी यांनी समन्वय साधून गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व गटसचिव यांच्या तसेच बँकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पीक विमा मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्याबाबतचेही आदेश दिले आहेत.
       तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गावस्तरावरील योजनेच्या अनुषंगाने फ्लेक्स, बॅनर्स तयार करून मोक्याच्या ठिकाणी तसेच दर्शनी भागात लावण्याची व्यवस्था करावी,मेळाव्याच्या वेळी येणार्‍या गरजू शेतकऱ्यांना ७/१२ मोफत मिळतील याची व्यवस्था करावी, यासाठी तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी प्राधान्याने जातीने लक्ष द्यावे,असे आदेशही जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
 
Top