
हे आहेत संभाव्य उमेदवार व इच्छुक - श्री मधुकरराव चव्हाण, श्री महेंद्र धुरगुडे, श्री आशोक जगदाळे, श्री देवानंद रोचकरी, श्री कैलास पाटील, श्री रोहन देशमुख, तसेच मतदारसंघात निर्णायक मतदार आसलेल्या धनगर समाजाने एकञ येऊन समाजाचा आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आहे.
आगामी येणा-या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आ. मधुकरराव चव्हाण हेच उमेदवार असणार याबाबत शंका नाही. चव्हाण यांचा जनसंपर्क व अनुभव पाहता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. वयाची ८० ओलांडूनही उत्साही असलेल्या चव्हाण यांनी तरुणांनाही मागे टाकले आहे. येणाऱ्या निवडणुकीत आता त्यांना कोण टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आ.मधुकरराव चव्हाण यांच्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव..
महेंद्र धुरगुडे – राष्ट्रवादीचे सर्वाधिक सक्रीय असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य महेंद्र धुरगुडे इच्छुकांच्या यादीतील महत्त्वाचे नाव आहे. तसे प्रयत्न त्यांनी जि.प.निवडणूकीच्या निकालानंतरच सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या तीन पंच वार्षिकमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या तीन वेगवेगळ्या गटातून विजय मिळविल्याचे सर्वश्रूत आहे. तसेच मतदारांसोबत त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क पाहता तेच विद्यमान आमदारास तोलामोलाची टक्कर देऊ शकतात असे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेतील त्यांची काम करण्याची चिकाटी, शेतकऱ्यांना अल्पदरात पाणबुडी मोटारी, गरजूंना योग्य ती मदत देऊन त्यांनी मतदारांच्या मनात जागा निर्माण केली आहे. धुरगुडे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिल्यास आमदार चव्हाण यांच्यासमोर तगडे आवाहन उभे करू शकतात, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे. माञ कोणत्याही परिस्थितीत धुरगुडे यांनी विधानसभा लढविण्याची तयारी करीत असल्याची चर्चा रंगत आहे.
अशोक जगदाळे - राष्ट्रवादीच्या इच्छुकापैकी आणखी एक नेते अशोक जगदाळे यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली असून २०१४ मध्येही ते इच्छुक होते. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला तारले होते. नळदुर्ग पालिकेत त्यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. मनी पॉवर असलेले मोठे उदयोजक व बड्या राजकारण्याशी हितसंबध असल्याने आमदार चव्हाण यांना तगडी लढत देऊ शकतात.
कैलास पाटील – शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचेही नाव शिवसेनेकडून चर्चेत येत आहे. त्यांनी जर या मतदरासंघात तयारी केली तर उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावाशी त्यांचा संपर्क आहे. माञ तुळजापूर तालुक्यातील मतदारासाठी ते नवखे ठरतील आणि त्यांना यासाठी शिवसेनेच्या तालुक्यातील नेत्यांना वा पदाधिका-यांना एकञ आणून तयारी करावी लागेल, असे बोलले जात आहे.
देवानंद रोचकरी - प्रत्येक विधानसभा निवडणूकीत उभे राहून काही वेळा विजयापासून थोडक्यात वंचित राहिलेले व निवडणूकीमुळे चर्चेत असलेले महत्वाचे नाव देवानंद रोचकरी यांनी मागील आठवड्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करत 'मै हूं ना' अशी दस्तक दिली. या मतदारसंघात त्यांचा हक्काचा एक गठ्ठा मतदार वर्ग आहे. माञ भाजपातूनच अनेक इच्छुक आहेत. अशावेळी तिकिट मिळवून नाराजांना आपलेसे करून भाजपाचा परंपरागत मतदार आपल्या बाजुने वळवल्यास इतक्या वेळा यशाने दिलेली हुलकावणी विसरून ते सुवर्ण योग साधू शकतात.
रोहन देशमुख -: लोकमंगल या उद्योग समुहामुळे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आपला ठसा उमटवणारे उदयोजक तथा विदयमान सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांचे पुञ व लोकमंगल मल्टिस्टेटचे अध्यक्ष युवा चेहरा असलेले रोहन देशमुख हे तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकमंगलचा कामगार वर्ग, स्वतंञ व शिस्तबद्ध यंञणा यामुळे रोहन देशमुख हे यशस्वी होऊ शकतात. माञ तालुक्यात त्यांचा जनसंपर्क म्हणावा तितका दिसून येत नाही. भविष्यात त्यांना तुळजापूर तालुका व उस्मानाबादचे ७२ गावात जनसंपर्क वाढविण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांतुन व्यक्त केले जात आहे.
धनगर समाजाने लक्ष वेधले - धनगर आरक्षण समितीने तुळजापूर विधानसभेसाठी समाजाचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे मतदार संघातील गणिते बदलू शकतात. निर्णायक मतदान व आरक्षणाचा लढा यामुळे धनगर समाजाचा अपक्ष उमेदवार अथवा मुख्य पक्षाने धनगर समाजाचा उमेदवार दिल्यास या निवडणुकीत यावेळी वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.