तुम्ही सोशल मीडियावर दिवसातले किती तास खर्ची घालता? हा प्रश् दुर्लक्षित करण्याजोगा नक्कीच नाही. जर सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या सान्निध्यात तुम्ही अधिक काळ व्यतीत करीत असाल, तर ती धोक्याची घंटा आहे, हे वेळीच ओळखलेले बरे. इंटरनेटने जगालाग्लोबल व्हिलेज बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असली, तरी हेच इंटरनेट आता जगभरातील लहान मुले, किशोरवयीन मुले आणि युवकांना मोठ्या संख्येने इंटरनेट व्यसनी (सायबर ॅडिक्ट) बनवीत चालले आहे. अमली पदार्थांचा व्यापार जगभरात ज्या वेगाने पसरला, त्याहीपेक्षा किती तरी अधिक वेगाने इंटरनेट पसरले असून, त्याचे व्यसन जडणार्या व्यक्तींचे प्रमाणही तितक्याच झपाट्याने वाढत आहे
सद्यःस्थितीत विशेषतः युवावर्गामध्ये सायबर व्यसनाधीनतेचे आणि त्यातही सोशल मीडियाचे व्यसन जडण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि अल्जेरियासह जगातील अनेक देशांमध्ये या व्यसनातून लोकांना बाहेर काढण्यासाठी खास क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. आपल्या देशातील दिल्ली आणि बंगळुरू शहरांमध्येही सायबर व्यसनमुक्ती केंद्रे उघडण्यात येत आहेत. वस्तुतः, देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगात सायबर व्यसन ही प्रचंड मोठी समस्या होऊन बसली आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेले हे इंटरनेटचे आणि सोशल मीडियाचे व्यसन कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या व्यसनमुक्ती केंद्रांची गरज निर्माण होणे दुर्दैवी आहे. या केंद्रांमध्ये व्यसनाधीन व्यक्तीचे जीवनऑफलाईनकरण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या डिजिटल व्यसनामुळे लोक आपल्या जीवनातील मूळ समस्यांपासून दूर पळू पाहत आहेत, हा सर्वात मोठा तोटा आहे. त्याचप्रमाणे मूलभूत चिंतन आणि विवेकी विचार कमी होत चालला आहे. लोकांचा सामाजिक परीघही संकोचत चालला असून, गर्दीतही माणूस एकटा होत चालला आहे. सायबर व्यसन ही मनाची अशी स्थिती आहे, ज्यामुळे लोक ऑनलाइन गेम, नेट सर्फिंग आणि सोशल नेटवर्कवर दिवसातील सर्वाधिक वेळ व्यतीत करू लागले आहेत. या व्यसनाला वेळेची मर्यादा उरलेली नाही. त्यामुळे स्वतःवरील नियंत्रण कमी होत चालले आहे. इंटरनेट मिळाले नाही, तर लोक अधीर, बेचैन होऊ लागले आहेत. कधी कधी तर, ते नैराश्याच्या गर्तेतही सापडू लागले आहेत. या व्यसनाने ग्रस्त लोक खोटे बोलणे, समस्यांंपासून दूर पळणे अशा टप्प्यांमधून अखेर नकारात्मक मनःस्थितीपर्यंत पोहोचत आहेत
साभार – दै. पुढारी

 
Top