सोलापूर : शासनाने घोषित केलेले 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला तातडीने देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. गतवेळच्या मुकमोर्चाच्या तुलनेत या चक्काजाम आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी असली तरी त्यांची आक्रमकता ही प्रचंड होती. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर आणि वडाळा यासारख्या ठिकाणी दगडफेकीच्या प्रकाराने आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामध्ये तीन एसट्यांचे नुकसान झाले.
सोलापूर शहराध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जुना पुना नाका येथील स्मशानभुमीत महाराष्ट्र शासनाचे श्राध्द घालून आंदोलनाला सुरवात केली. जुना पुना नाका चौकातील छ.संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून काही जमावाने छ.शिवाजी चौकाकडे कुच केली तर काही जमाव तुळजापूर नाक्यावर पोहोचला. या दोन्ही ठिकाणी अकराच्या सुमारास एकाचवेळी कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. शिवाजी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
त्यांनतर एसटी स्थानकात तिन्ही बाजूच्या एसटीबस कार्यकर्त्यांनी रोखून धरल्या. त्यामुळे शिवाजी चौकापासून नवीवेस चौकी पर्यंत एसटीबस, टेम्पोच्या रांगा लागल्या होत्या. त्याच वेळी तुळजापूर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारून रस्त्यावरच मुंडन आंदोलन केले. येथेही मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करताना जोपर्यंत 16 टक्के आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र तासाभराने साडेबारा च्यासुमारास पोलिसांनी बळाचा वापर करत प्रमुख कार्यकर्त्यांना त्याब्यात घेतले.
दहा एसटी बस फोडल्या : एक पेटवली
शिवाजी चौकामध्ये एसटीच्या रांगा थांबल्यानंतर मध्येच एका एसटी ड्रायव्हरने दुसर्या मार्गे एसटी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक जमावाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी पळत जाऊन एसटीला अडविले आणि त्या एसटीवर दगडफेक करत एसटीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावरीस एसटीबस वाहतूक सुरळीत सुरु झाली मात्र तासाभरातच मोहोळ,नान्नज मार्गे येणार्या एसटी बस अडवून त्यातील प्रवाशांना बाहेर काढून एसटीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. नान्नज वरून येणार्या एसटी बसला आडरानातच थांबवून पेटवून देण्यात आले. त्यात एसटी जळून खाक झाली. या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात रस्त्यावर दिसेल त्या एसटी बस फोडण्याला उत आला आणि सायंकाळी चार पर्यंत शहर व जिल्ह्यात दहा एसटीबसची तोडफोड करण्यात आली.
साभार - पुढारी ऑनलाईन