आज श्रावणी सोमवार, नळदुर्ग जवळच असलेल्या आलियाबाद परिसरातील भिमाशंकर देवस्थान बाबतची माहिती भाविक भक्तांसाठी देत आहे.

   निसर्गाचा अद्भूत नजारा नळदुर्ग परिसरात पाहणास मिळतो. भिमाशंकर हे स्थान डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवस्थान सर्वानी आवश्य पाहावे व डोळयाचे पारणे फेडावे . श्रावण सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होते.

भिमाशंकर लिंग
छायाचित्र सौजन्य - बबन साळुंखे
देवस्थान वैशिष्ट्ये

भिमाशंकर हे देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. बहामनी किंवा चालुक्य काळातील असावे कारण नळदुर्ग किल्ल्याचे व देवस्थान बांधकामात साम्य आढळते.
बालाघाट डोंगराच्या मध्ये चौकोन बांधकामात म्हणजे खोल हौदा सारखे चिरेबंदी बांधकाम आहे .बांधकाम शैली अत्यंत उत्कृष्ट आहे . मधोमध उत्तरामुखी शिवपिंड आहे. अत्यंत सुबक सुंदर मन प्रसन्न करणारे देवस्थान आहे.

बेलाचे झाड : देवस्थानाच्या समोर बेलाचे, चाफ्याचे झाड आहे. हे वैशिष्टये सांगायचे कारण की ' ऐरवी इकडे कोणीही फिरकत नाही. परंतू झाडांचे बेलपत्र व फूले गळून शिवाला वाहिले जातात.

गोमुख 
गोमुख - देवस्थानाच्या डाव्या बाजूला गोमुख आहे. तेथे बारा महिने गोमुखातून पवित्र गंगाजल येते. हे जल कुंडातून गुप्त पाताळात होते. म्हणजेच जमिनीच्या खाली गुप्त  होऊन पाताळ गंगा देवस्थानाच्या खालून उजव्या बाजूला वाहत येते .

पाताळगंगा - पाताळातून गंगा वाहत येते म्हणून पाताळ गंगा म्हणतात. अत्यंत पवित्र व स्वच्छ पाणी आहे.  झऱ्याच्या रूपाने वाहते हे गंगाजल अभिषेकास हेच जल वापरतात

नळदुर्ग जवळ आलियाबाद शिवारात पवित्र  भिमाशंकराचे देवस्थान आहे. हे देवस्थान नळदुर्गचे वैभव आहे. निसर्गाच्या कुशीस वसलेले अत्यंत देखने - वैभव प्राप्त झालेले पवित्र क्षेत्र आहे. दर्शनास पायी जावे लागते कारण तेथे जाण्यास वाहनासाठी रस्ता नाही. श्रावण महिना आणि पायी निसर्ग सहलीचा आनंद कांही वेगळाच आहे .डोळयांना थंडावा देणारे हिरवेगार डोंगर,रानफूले,धरण सर्व पाहून मन थक्क होते.

ईश्वराची किमया सारी
सजली धरित्री, लेवून हिरवाई
सजवली फूल, वेली न्यारी
रंगीबेरंगी  फुलपाखरे भिरभिरती
सजली सृष्टी सारी
हिरवळ दाटे, मन जाई मोहून
स्पर्श मखमली पायी अनवानी
जणू मखमली गालिच्या पसरे भूवरी
सजली सृष्टी सारी
निसर्ग सारा गेला सजून
पहा नयन भरभरून
विश्व चित्रकाराची, चित्रकारी
सजली सृष्टी सारी
रंग भरीले विविध रंगातून
सजवीले चित्र कल्पनेतून
विश्व चित्रकाराची  जादूगारी

      भिमाशंकराच्या पाठीमागे आता तयार झालेले हेबळीचे धरण.त्यामुळे देवस्थानाचे सौदर्य अजून खुलून दिसते.निसर्ग सहलीचा खरा आनंद आपल्या नळदुर्ग परिसरात आहे . त्याचा आनंद सर्वानी घ्यावा व परिसराची स्वच्छता राखावी व निसर्ग सहलीचा व शिवदर्शनाचा लाभ घ्यावा. सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा .

भिमाशंकर मार्ग : .
- रामतीर्थ मार्ग पायी रस्ता 
- जळकोट रस्ता मार्ग पुदाले द्राक्ष बागायतदार शेतातून सरळ रस्ता दोन ते तीन डोंगरे चढ उतार करावी लागते
- जळकोटहून आलियाबाद तांडा मार्ग पायी रस्ता .
- स्थानिक लोकांच्या मदतीने भिमाशंकरास जाता येते .

- कविता रमेशराव पुदाले
       नळदुर्ग


 
Top