नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील येडोळा, जळकोट व जिल्हयात असलेल्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील डवरी गोसावी समाजाच्या कुटूंबांना शासकीय योजनेतून घरकुल व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे हे प्रयत्नशील आहेत. 

काही महिन्यापूर्वी धुळे जिल्हयातील राईनपाडा येथे अफवेमुळे हत्याकांड झाले होते. त्या अनुषंगाने शासन नाथपंथी डवरी गोसावी समाजाना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत असून या पार्श्वभूमीवर दोन आठवडयापूर्वी उस्मानाबाद येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या समाजाला जागा उपलब्ध करुन त्यांना पाणी, लाईट, रस्ता या सोयीसुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

तुळजापुर तालुक्यातील येडोळा, जळकोट व उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी आदीसह इतर ठिकाणी डवरी गोसावी समाजाची संख्या मोठी आहे. येडोळा येथे राहणा-या डवरी समाजाची शंभर घरे असून त्यांना जागा नाही. बाहेर गावी जावून बहुरुपीच्या माध्यमातूनच हा समाज उदरनिर्वाह करतो.  ना स्वतःचे घर, ना नोकरी, शासनाच्या सर्वच सोयीसुविधांपासून हा समाज वंचित असून ना घरका ना घाटका अशा प्रकारचे भटकंती करून पोटाची खळगी भरण्यासाठी जीवन जगत आहे. भटक्या विमुक्त जातीकरिता असणार्‍या २७ टक्के अरक्षणापैकी एक टक्के आरक्षण या समाजाला मिळत नाही. भटका भूमीपूत्र असलेला नाथपंथी डवरी गोसावी समाज हा मात्र अजून उपेक्षितच आहे.

काही दिवसांपूर्वी जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी येडोळा गावास भेट देवून डवरी गोसावी कुटूंबियांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शासन स्तरावर प्रश्न करुन आहे त्या जागेत किंवा जागा उपलब्ध करुन घरकुल व पाणी, लाईट, रस्ता आदी सोयी-सुविधा शासनाच्या योजनेतून उपलब्ध करुन देणार असून त्याचबरोबर वर्षभरातील काही महिने भिक्षा मागण्यासाठी गाव कुसाबाहेर जाणा-या कुटूंबियातील सदस्याना ओळखपत्र मिळवून देणार असल्याचे महेंद्र धुरगुडे यांनी बोलताना सांगितले. 

याप्रसंगी माजी सरपंच दिनकर पाटील, डवरी समाजाचे भिमराव शेजर, तात्याराव चव्हि, खिमाजी शेजर, संतराव सावंत,  गोरख शिंदे, सिताराम सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top